Skip to main content

Vachnatun Janale mee: या आठवड्याचे वाचन BOMBAY PLACE-NAMES AND STREET-NAMES

 

रंग लेखणीचे परिवार

उपक्रम : वाचनातून जाणले मी

दिनांक : 23/04/2021

शब्दांकन : योगेश गोगवेकर 

संकेत स्थळ :

पुस्तकाचे नाव : BOMBAY PLACE-NAMES AND STREET-NAMES

लेखक : सॅम्युअल टी शेपार्ड

वाचनासाठी लागलेला कालावधी : 3 दिवस

 

वाचनानुभव :

 

मला जर कुणी विचारलं की भारतातील तुझी आवडती ठिकाणे कोणती तर माझे उत्तर असेल मुबंई आणि गोवा. त्यात मुंबई फारच प्रिय. मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी. या शहराच्या रस्तावर फिरत खेळत मोठा झालो. त्यामुळे ह्या शहराचा इतिहास काय आहे, ह्या शहराच्या रस्त्याला कशी नावे दिली गेली ह्याचे मला नेहमीच कुतूहल असायचे. जेव्हा मी मुंबईत फिरू लागलो तेव्हा मला अनेक रस्त्यांची नावे कशी आली याचे कोडे उलगडत नव्हते. गिरगांव, भुलेश्वर, चर्नी रोड, क्रॉफर्ड मार्केट, पायधूनी, वगैरे नावे कशी दिली गेली त्यामागे काही करणे आहेत का? असे प्रश्न मला नेहमीच पडत असे. त्याबद्दल मी अनेक लोकांकडे ह्याची चौकशी केली तर मला व्यवस्थित उत्तरे मिळत नव्हती. तेव्हा मी ठरवले की मुंबईचा इतिहास वाचायचा आणि त्यातील उत्तरे शोधायची. सुरुवातीला काही मराठी पुस्तके मिळवली पण त्यात हवी तशी माहिती मिळत नव्हती. त्यासाठी इंग्रजी पुस्तकांकडे वळावे लागले आणि मग मुबंई शहराच्या बद्दलचा बराच खजिना हाती लागला. त्यात अनेक पुस्तके होती पण मुंबई शहराच्या रस्त्यांना, मग ते रस्ते मोठे असो किंवा लहान, त्यांना नावे कशी पडली या नावाचे एक इंग्रजी पुस्तक हाती पडले. त्या पुस्तकाचे नाव आहे "Bombay Place-Names And Streets-Names, An Excursion into the by-ways of the history of Bombay City आणि या पुस्तकाचे लेखक आहेत  सॅम्युअल टी शेपार्ड हे ब्रिटिश गृहस्थ. ह्या पुस्तकाची नवीन प्रत मागील आठवड्यात मला मिळाली आणि मला झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.

 

सॅम्युअल टी शेपार्ड यांनी हे पुस्तक लिहिले 1917 साली. म्हणजे शंभर वर्षांपूर्वी.तेव्हा ते टाइम्स ऑफ इंडिया ह्या इंग्रजी दैनिकाचे संपादक होते. त्यांना मुंबई शहराबद्दल प्रचंड ओढ आणि आस्था होती. त्यांनी त्यासाठी मुंबईच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांना बरीच भ्रमंती करावी लागली आणि  मिळालेली माहिती या पुस्तकात समाविष्ट केली. या पुस्तकाला लेखकाने एक उप शीर्षक दिले आहे. त्यासाठी त्यांनी इंग्रजी शब्द वापरला आहे Excursion. त्याचा मराठीत अर्थ आहे छोटी सहल किंवा फेरफटका. हे पुस्तक फक्त नावांचा शोध नसून मुंबईच्या परिसरातील विविध रस्त्यांना त्याकाळी जी नावे होती त्यांचा आधार घेऊन ती नावे का व कशी देण्यात आली ह्याचा एक सुंदर इतिहास आहे. हे पुस्तक ज्या वेळेस लिहिले तेव्हा मुंबई शहरात खूप बदल होत होते. मुंबईच्या उत्तर भागात म्हणजे दादर, माटुंगा, माहीम, शीव खूप विकास होत होता तर पश्चिमेकडील भागात चौपाटी आणि बॅकबे बनत होते. ब्रिटिशांना मुंबई मिळाली ती इ. स. 1661 (11/05/1661) साली. तेव्हा मुंबई हे सात बेटांचे शहर होते. या शहराच्या सर्व बाजूने पाणी आणि दलदल होती. ब्रिटिशांनी ही बेटे एकमेकांना जोडली व पायाभूत सुविधांचे बांधकाम करून त्यांनी मुख्य संस्था उभारल्या आणि अठराव्या शतकाच्या अखेरीस मुंबई हे शहर बनवले. ह्या शहराचा खरा विकास झाला तो एकोणिसाव्या शतकाच्या मध्यभागी. पण खऱ्या विकासाला सुरुवात झाली ती 1888 साली स्थापन झालेल्या मुंबई म्युनिसिपल कोर्पोरेशनमुळे.

 

ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या माहितीनुसार असा निष्कर्ष निघतो की एकोणिसाव्या शतकाच्या उत्तर्धापर्यंत मुंबईच्या रस्त्यांना नावे नव्हती. जी काही नावे होती ती देवदेवतांवर आधारित होती. उदा. प्रभादेवी, मुंबादेवी, काळबादेवी, शीतलादेवी, गांवदेवी वगैरे. ही नावे आजही तशीच प्रचलित आहेत. शेपार्डने ह्या पुस्तकात मुंबईच्या रस्त्यांची जी नावे सविस्तरपणे सांगितली आहेत ती एका बाजूला माहीमपर्यंत तर दुसऱ्या बाजूला शीवपर्यंत घेतली आहे. त्यात त्यांनी रस्ते, मार्ग, पूल आणि रेल्वे स्थानक यांची नावे घेऊन त्या नावांचा पूर्ण तपशील दिला आहे. सर्व साधारण एक समज असा आहे की ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आणि प्रशासकीयांनी जी रस्त्यांना दिली ती सर्व नावे त्यांच्याच लोकांची होती पण हे पुस्तक वाचताना हा समज दूर होतो. कारण बरीच नावे स्थानिक भारतीयांची असल्याचा पुरावा ह्या पुस्तकात आढळतो. त्याचप्रमाणे हे पुस्तक कोणत्याही एका समुदायचे नाव रस्त्याला असल्याचे नमूद करत नाही पण अरबी लेन्स, आर्मेनियन लेन, इस्राईल लेन आणि चिनी गल्ली ही नावे कशी आली याचे सुंदर विवेचन करते.

 

1917 साली जेव्हा हे पुस्तक लिहिले गेले तेव्हा मुंबईमध्ये आजच्या सारखीच वरळी होती. तसेच वाळकेश्वर, दादर, शीव, नळ बाजार, फोर्ट वगैरे सुद्धा भाग होते. प्रचंड मेहनत घेऊन लेखकाने माहितीचे भरपूर धागे गोळा केले आणि मनोरंजक पद्धतीने ह्या पुस्तकात मांडले. त्यासाठी आपण काही उदाहरणे पाहू. पाहिले उदाहरण म्हणजे अब्दुल रेहमान स्ट्रीट ह्या रस्त्याचे. हा रस्ता क्रॉफर्ड मार्केटच्या पलीकडील रस्ता. ह्याला अब्दुल रेहमान हे नाव कसे पडले ह्याचे सुरेख विश्लेषण या पुस्तकात केले आहे. सुरुवातीला हे अब्दुल रेहमान कोण असा प्रश्न त्यांना पडला आणि तो त्यांनी अनेकजणांना विचारला. काही लोकांनी त्यांना सांगितले की येथे अब्दुल रेहमान नावाचा एक घोड्यांचा व्यापारी होता त्यावरून हे नाव या रस्त्याला पडले. पण शेपार्ड यांवर विश्वास ठेवू इच्छित नव्हते. त्यावेळी विख्यात विद्वान असलेले आर पी कारकारिया यांनी शेपार्डना सांगितले की कल्याण येथील डोंगरावर अब्दुल रेहमान नावाच्या पिराची कबर आहे आणि त्याचे जे भक्त इथे राहतात म्हणून त्या रस्त्याला अब्दुल रेहमान स्ट्रीट नाव दिले आहे. शेपार्डने यावरही विश्वास ठेवला नाही आणि या नावाचे खरे कारण शोधून काढले. हा अब्दुल रेहमान होता महाराष्ट्रातील कोकण भागातला म्हणजे कोकणी मुसलमान. इ. स. 1765 च्या सुमारास या भागातील मोठया जमिनीचा तो मालक होता म्हणून या भागाला अब्दुल रेहमान स्ट्रीट असे म्हणत असत. पुढे ही जमीन जमशेद जीजीभाय यांनी घेतली तरी जुने नाव अजूनही प्रचिलीत आहे.

 

तसेच चर्नी रोड या रस्त्याचे. इ. स.1822 ते 1838 मध्ये मुंबईचा फोर्ट भाग हा अतिशय गजबजलेला परिसर होता. व्ही टी रेल्वे स्थानका समोर एक कॅम्प नावाचे मैदान होते. तिथे अनेकजन आपली गुरेढोरे चरण्यासाठी घेऊन येत असत. त्यावर 1938 साली ब्रिटिश सरकारने ते मैदान वापरण्यावर कर लावला. पण या गुरांचे मालक गरीब असल्यामुळे तो कर देऊ शकत नव्हते. तेव्हा जमशेद जीजीभाय यांनी स्वतःच्या खिशातून वीस हजार रुपये खर्च करून ठाकूरद्वार येथील गवताळ जमीन विकत घेतली आणि ती गुरांना चरण्यासाठी उपलब्ध केली. तेव्हापासून या भागास चर्नी रोड हे नाव पडले असे या पुस्तकात नमूद केले आहे. ह्याच प्रमाणे तिसरे उदाहरण आहे ते बाबुलनाथ रोडचे. हा रस्ता बांधला P W D या संस्थेने. इ. स 1901 मध्ये त्यांनी हा बांधलेला रस्ता मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात दिला. मलबार टेकडीच्या जवळ असलेल्या रस्त्याला बाबुलनाथ रोड हे नाव कसे दिले गेले ह्याचे सुंदर विवेचन या पुस्तकात दिले आहे. ह्या पुस्तकात लेखकाने अनेक संदर्भ लक्षात घेऊन सांगितले आहे की हे नाव बाबूल ह्या शिवाच्या मंदिरावरून पडले हे खरे पण या मंदिराचे नाव बाबूलनाथ ठेवले कारण बाबूल हिरजी नाथ हा सोमवंशी क्षत्रिय शिवाचा अभिषेक करण्यासाठी लागणारा खर्च आपल्या स्वतःच्या खिशातून देत असे. अशी अनेक उदाहरणे या पुस्तकात आहे. त्यामुळे विषय खूप मनोरंजक होतो.

 

रस्त्यांच्या नावाच्या इतिहासाशिवाय हे पुस्तक आपल्याला त्याकाळातील मुंबईत राहत असलेला समुदाय, परिसर, मुंबईतील वनस्पती, ब्रिटिश कार्यकर्ते, मुंबईतील प्रसिद्ध व्यक्ती व  व्यापारी आणि त्यांची मालमत्ता ह्यांचीसुद्धा माहिती देते. त्यामुळे पुस्तक वाचण्याचा खूप आनंद मिळतो. मुंबईच्या रस्त्यांना दिल्या गेलेल्या नावांचे परीक्षण करून शेपार्डने जो इतिहास सांगितला आहे तो अनेक संदर्भ देऊन सांगितला आहे. त्या संदर्भाचा उल्लेख प्रत्येक नावाबरोबर दिला आहे. या पुस्तकाची मूळ प्रत आज मिळत नसली तरी 2017 साली या पुस्तकाची नवीन प्रत काढण्यात आली. हे पुस्तक 1917 साली लिहिले असल्यामुळे या पुस्तकात बरीच रस्त्यांची जुनी नावे आहेत. त्यातील बरीच नावे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बदलण्यात आली. त्यांची बदलेली नावे या पुस्तकाच्या शेवटी देण्यात आली आहे. ती देताना त्या रस्ताचे जुने नाव आणि त्यापुढे बदलेले नाव दिले आहे.

 

हे पुस्तक थॉमस प्रेस इंडिया लिमिटेड, नवी दिल्ली येथून प्रकाशित झाले असून त्याची किंमत 499/- रुपये आहे. हे पुस्तक 167 पानी असून नीटपणे वाचण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागतो. हे पुस्तक मुबंईच्या माहितीसाठी फारच उपयोगी आहे. ज्या मुंबई शहरात आपण राहतो त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी पडेल आणि पुढे येणाऱ्या नवीन पिढीलाही मुंबईचा इतिहास माहित होण्यास मदत होईल.

 

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...