Skip to main content

Ramduta Prabjanjana रामदूता प्रभंजना (लेख

 

रंग लेखणीचे परिवार

आव्हानात्मक विषय 

आठवडा क्रमांक : 132

विषय क्रमांक :1

विषय : रामदूता प्रभंजना (लेख)

दिनांक :28/04/2021

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

मारुती हे हिंदुधर्मातील एक लोकप्रिय दैवत आणि रामायणातील मोठी व्यक्तिरेखा. या देवतेची प्रतिमा जनमानसात इतकी खोलवर रुजलेली आहे की भारतातील प्रत्येक गावात ह्या देवतेचे मंदिर आपण पाहत असतो. सप्तचिरंजीवीपैकी एक चिरंजीव असलेले हे दैवत अनेक नावाने ओळखले जाते.  यास एकशे आठ नावे असली तरी ह्या दैवतास कुणी अंजनेय, महावीर, महाबली, हनुमान, मारुती, रामदूत, कपीश्वर, महाकाय, वज्रकाय वगैरे नावाने ओळखतात. या देवाची खरी ओळख प्रभू श्रीरामचंद्राचा प्रमुख सेवक अशीच आहे. तरीसुद्धा हे दैवत शक्तिशाली असून भूत, प्रेत, पिशाच्च यापासून सुटका करणारं आहे असे मानले जाते. त्यामुळे या दैवताची देवळे गावाबाहेर झाडाखाली शेंदूर लावलेली मूर्ती आपल्या नजरेस पडतात. रामायणातील शक्तिशाली असलेलं हे दैवत आपणास महाभारतात आणि अनेक पुराण कथेतपण आलेले दिसते. रामायणात हे दैवत प्रभू श्रीरामचे परमभक्त तर आहेतच तरीसुद्धा महाभारतात हेच दैवत श्रीकृष्णाची सेवा करताना दिसते.

अश्या या दैवताचा जन्म वानर नावाच्या रानटी लोकांच्या कुळात झाला. हे वानर लोक आर्य नसून भगवान शंकराचे परमभक्त होते. ह्या वानर लोकांमध्ये केसरी नावाचा वानर आणि त्याची पत्नी अंजनी असे पतिपत्नी महाराष्ट्रातील नाशिक भागातील अंजनेरी गावात राहत होते. यांनी भगवान शंकराची आराधना कित्येक संवत्सरे केल्यानंतर त्यांना भगवान शंकराच्या वराने जो पुत्र झाला तो परमप्रतापी, वज्रदेही आणि चिरंजीवी असा झाला. तोच हनुमान मारुती होय. त्याचा जन्म चैत्र पौर्णिमेस सूर्योदयसमयी झाला. म्हणून त्यादिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. मारुतीच्या जन्मासंबंधी आपण वेगवेगळी पुराण कथा वाचली किंवा आपण उत्तर आणि दक्षिण भारतात गेलात तर तुम्हाला मारुतीच्या जन्माची तारीख वेगवेगळी असल्याचे जाणवते. तामिळनाडू आणि केरळमध्ये ती मार्गशीर्ष महिन्यात, ओरिसामध्ये वैशाख महिन्यात आणि उत्तर भारतात नरक चतुर्दशीच्या दिवशी  साजरी करताना दिसते पण महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती साजरी होते.

हनुमान मारुती हा अतिशय ताकदवान, धाडसी, धोरणी, सत्वशील असल्याचे सांगितले जाते. त्याच्या इतकी  स्वामिनीष्ठ व राजनिष्ठ असलेल्या व्यक्ती फारच क्वचित  जन्माला येतात. त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. तो विज्ञानी, राजनीतिज्ञ आणि संगीततज्ञ सुद्धा होता. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. तेव्हा सर्व देव भयभीत झाले. ते बघून इंद्राने आपले वज्र हनुमानावर फेकले. या आघातामुळे हनुमानचे तोंड वाकडे आणि तांबडे होऊन तो बेशुद्ध पडला. म्हणून त्याला ताम्रमुख म्हटले जाते आणि हनुमान सुद्धा म्हटले जाते. भगवान शंकराच्या वराने आणि कडक ब्रह्मचर्यांच्या योगाने तो वज्रदेही बनला खरा पण त्याने केलेल्या अनेक पराक्रमामुळे त्याच्यापुढे अनेक महाविरांचे तेज फिक्के पडत असे. काहीजण हनुमानाला वायु किंवा मरुत ह्याचा पुत्र मानीत असल्यामुळे त्याचे नाव मारुती असे पडल्याची लोककथा आहेत. मारुतीच्या कडक ब्राम्हचर्यामुळे फक्त पुरुषच मारुतीच्या मूर्तीची विधिपूर्वक पूजा करतात.

हनुमानाचे खरे कौशल्य दिसते ते रामायणात. हनुमान रामायणात येतो ते किष्किन्धा कांडात आणि सुंदर कांडात त्याचे वर्णन विस्ताराने येते. हनुमानाचे अजून एक नाव म्हणजे सुंदर. म्हणून या कांडास सुंदर हे नाव दिले असावे असे वाटते. आपल्या वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी प्रभू श्रीराम आपली पत्नी सीतामाता  आणि भाऊ लक्ष्मण यांच्याबरोबर वनवासात जातात. पुढे जेव्हा सीतामातेचे लंकेचा राजा रावणाकडून अपहरण होते तेव्हा सीतामातेला शोधत प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण  ह्या वानर राज्यातील किष्किन्धा नगरीत येतात. तिथे त्यांची भेट सुग्रीव आणि हनुमानशी होते. रावण सीतामातेला लंकेला घेऊन गेला तेव्हा आकाश मार्गे जाऊन सीतामातेला निरोप देणे गरजेचे होते आणि त्या राक्षस नगरीत जाऊन हेरगिरी करून रावणाचे सामर्थ जाणून घेऊन त्याची अटकळ बांधणे जरुरीचे असते. प्रभू श्रीरामाने असे सांगितल्यावर हनुमानाने आकाशमार्गे लंकेला जाऊन सीतामातेला श्रीरामाचा निरोप तर दिलाच पण रावणाला त्याच्याच सामर्थ्यांची जाणीव करून त्यास जेरीस आणले. रावणाने जेव्हा त्याच्या शेपटीला कापडाच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली, तेव्हा त्याने प्रत्येक घरांवर उड्या मारत पूर्ण लंकेला आग लावली आणि लंका सोडली आणि प्रभू श्रीरामास सीतामातेचे वर्तमान सांगितले.  नंतर हनुमानाने नल आणि नील यांची मदत घेऊन रामसेतू बांधून संपूर्ण वानरसेना घेऊन प्रभू श्रीरामा बरोबर लंकेत प्रवेश केला आणि प्रभू श्रीरामाने असुरांचा राजा रावण याचा युद्धात पराभव केला. या युद्धात हनुमानाने रामाला खूप मदत केली. रावणपुत्र मेघनाथानी केलेल्या जोरदार प्रहारामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला तेव्हा त्याचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी बुट्टी जरुरीची होती. त्यासाठी ती बुट्टी मिळवण्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वतच उचलून घेऊन आला आणि लक्ष्मणचे प्राण वाचवले. म्हणूनच या युद्धात हनुमानाचे कार्य फार मोठे आहे.

हनुमान मारुतीचे महत्व उत्तरेकडे तुलसीदासांनी तर दक्षिणेकडे समर्थ रामदासांनी वाढवले. त्यामुळे मारुती आपल्याला पुराणातून, साहित्यातून आणि मूर्तितून ठिकठिकाणी भेटतो. दक्षिण हिंदुस्तानात असे एकही खेडे नाही की तेथे मारुतीचे देऊळ नाही. महाराष्ट्रात रामदास स्वामीमुळेच रामभक्ती बरोबर हनुमानाचे महत्व वाढवले  आणि जागोजागी मारुतीची देवळे उभारली. शिवाजीमहाराजांनी ज्या ठिकाणी कोट, दुर्ग आणि किल्ले बांधले त्या सर्व ठिकाणी बलभीम मारुती हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो. असा हा सदाविजयी, राजनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ रामदूत सर्व मराठे वीरांस फार मोठा आदर्श देव वाटत होता. समर्थ रामदास स्वामींना मारुतीचा फार मोठा आधार होता कारण त्यांचे वडील सूर्याजीपंत, बंधू गंगाधरपंत आणि स्वतः समर्थ ह्यांना हनुमंताचे दर्शन झाले होते आणि प्रभू श्रीरामाने त्यांना अनुग्रहसुद्धा दिला होता. त्यांनी हनुमानावर एकवीस स्तोत्रे लिहिली आहेत. असेच एका स्तोत्रात ते म्हणतात की रामाच्या भक्तीत मग्न असलेला हनुमान भक्तावर संकट आले म्हणजे ध्यान बाजूला ठेवतो आणि भक्तांच्या मदतीला धावून जातो.

पुराण कथेत जे सात चिरंजीव सांगितले आहेत त्यापैकी एक हनुमान मारुती आहे. जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेव्हा तिथे मारुती हजर होतो असे म्हटले जाते. मारुतीच्या चरित्र्यावरून काही गोष्टी बोध घेण्यासारख्या आहेत. तो मूर्तिमंत, राजनीष्ठ आणि स्वामिनीष्ठ यांचा पुतळा आहे. त्याने केलेला स्वार्थत्याग, अखंड केलेले प्रेम, अलोट धैर्याने केलेले पराक्रम आणि त्याचे सामर्थ आपल्याला सदैव आदर्श म्हणून नजरेसमोर ठेवले पाहिजे. कारण जनमानसात त्याची प्रतिमा खोलवर रुजलेली आहे. शैव त्याला रुद्राचा अवतार मानतात तर रामदूत असल्यामुळे तो वैष्णवात सुद्धा पूज्य आहे. तो गावाचे रक्षण करीत असल्यामुळे सारेच त्याची पूजा करतात. रामायणातील त्याचे कार्य इतके प्रचंड आहे की मारुती शिवाय रामायण कथा पूर्ण होत नाही. या लेखाच्या शेवटी समर्थ रामदास स्वामीने जे मागितले आहे ते सांगून  हा लेख संपवितो. समर्थ मागतात, " तुझ्या असलेल्या प्रचंड शक्तीच्या साठ्यातील एक अंश तू आम्हांला दे".

धन्यवाद 

 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...