*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक :129*
*विषय क्रमांक : 4*
*विषय :चैत्र चाहूल (लेख)📝*
*दिनांक : 7/04/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई*
एकदाका होळी पौर्णिमेला होळी पेटली की थोडया दिवसात कोकिळेचे कुहू-कुहू सुरु होते, उन्हाच्या झळा जाणवू लागतात आणि हवेत एक प्रकारचा गंधयुक्त सुवास दरवळू लागतो, तेव्हाच चैत्राच्या आगमनाची चाहूल लागायला सुरुवात होते. चैत्र हा मराठी महिन्यात येणारा पहिला महिना. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे हा महिना एप्रिल महिन्याच्या सुमारास येतो. चैत्राचा पहिला दिवस हा भारतीय परंपरेनुसार फार महत्वाचा मानला जातो. कारण चैत्र शुक्ल प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे आपल्या पुराण कथा सांगतात. म्हणूनच ह्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करतात आणि साडेतीन मुहूर्तातील एक सण असेही मानतात. चैत्र महिना हा वसंत ऋतुच्या प्रारंभी गणला असल्यामुळे कित्येक सणांची निर्मिती त्या ऋतुस योग्य होतील असेच सण ह्या महिन्यात रूढ झाले. काही पुराण कथेनुसार चैत्रातील पहिल्या दिवशी प्रभू रामचंद्र आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परत आले म्हणून हा दिवस महत्वाचा मानला जातो. धर्मसिंधु ग्रंथामध्ये चैत्र शु. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवी नवरात्रीचा उत्सव शारद नवरात्राप्रमाणे साजरा करावा असे म्हटले आहे. ह्याच महिन्यात चैत्र शुक्ल नवमीचा दिवस प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो आणि रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेस अरुणोदयासमयी झाल्यामुळे चैत्र पौर्णिमा ही हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. अशा अनेक प्रकारच्या उत्सवाची तयारी सुरु झाली म्हणजे चैत्राची चाहूल लागायला सुरुवात होते.
माझ्यासाठी मुंबई ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. चैत्राची चाहूल घेण्यासाठी मुंबईकरांना बहुधा भिंतीवरील कालनिर्णय ह्या कॅलेंडरचा उपयोग होतो. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना परीक्षेचे ढोल वाजू लागले किंवा रात्रीचा सुखद गारवा संपून हवा गरम होऊ लागली की आम्ही समजायचो की चैत्राचे आगमन होत आहे. वाणिज्य शाखे मध्ये शिक्षण पुरे केल्यामुळे जेव्हा नोकरीत लागलो तेव्हा मार्च अखेरीस आर्थिक वर्षाचे ऑडिट सुरु झाले की आम्हाला चैत्र आल्याची चाहूल लागत असे. मुंबईमधील अजून एक जागा अशी आहे की तिकडे गेल्यावर चैत्राची चाहूल हमखास लागते ती म्हणजे मुंबईतील भाजीफळे विकण्याची बाजारपेठ. त्या बाजारात कैऱ्यांचे, करवंदाचे, जांभुळाचे वा कलिंगडाचे आगमन अथवा संत्री व द्राक्षे यांचे बाजारातून कमी होणे किंवा पंधरा दिवसापूर्वी कमी असलेले वाटण्याचे भाव वाढू लागले की समजावे चैत्राच्या आगमनाची सुरुवात झाली आहे. मुंबईत जरी चैत्राच्या आगमनाची चाहूल वरीलप्रमाणे दिली असली तरी अजून एका वाटेने ह्या महिन्याची चाहूल लागते ती म्हणजे वसंत ऋतूचे आगमन. मुंबईच्या सिमेंट सडकेवर उभे असलेले पिंपळ, गुलमोहर, सोनमोहर, आंबा, पळस आणि इतर काही वृक्षे आपल्याला वसंत ऋतुचे आगमन होत असल्याची जाणीव करून देत असतात. एखाद्या राजाप्रमाणे हा महिना अगदी व्यवस्थितपणे आणि अभिरुचीनुसार आपल्या पर्यंत मोगऱ्याचा सुगंध पसरवतो, आंब्याची डाळ व पन्हे वगैरेची व्यवस्था करतो, तेव्हाच चैत्राच्या आगमनाची चाहूल लागते.
सुप्रसिद्ध लेखिका आणि विदुशी दुर्गा भागवत आपल्या ऋतूचक्र ह्या पुस्तकात म्हणतात, "फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह असलेले, बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हाने अंग भाजणारे, पण त्याचवेळी अत्यंत शीतल सुखकारक अशा दक्षिणानिलांनी गात्रांना सुखविणारे, दृष्टीला भ्रांत करणारे, प्राणिमात्रांतल्या निर्मितीच्या शक्तीच्या उन्मादक वृत्तीना चेतविणारे, असे हे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला, तरी चैत्र हा खरा वसंतात्मा आहे. मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, ह्यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकार आहे ". हे त्यांनी केलेले वर्णन फारच सुरेख आणि मनाला तंतोतंत पटणारे आहे. ह्याची जाणीव आपल्याला फाल्गुन महिना संपताना आणि चैत्र महिन्याच्या आगमनाची चाहूल लागताना होत असते. हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने हळुहळु गळु लागतात तेव्हा पृथ्वी अगदी निष्पर्ण, उजाड आणि उदास वाटू लागते. वसंताची चाहूल लागताच झाडांवरच्या फ़ांद्याना कोवळी पालवी फुटायला लागतात आणि वृक्ष सजू लागतात. काही काळानंतर वृक्षांना कळ्या धरू लागतात मग त्या कळ्यांचे रूपांतर फुलात होऊन वृक्ष माणसाचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेत असतो. उदाहरण द्यायचे झाले तर सोनमोहरचे. आकाराने हे झाड गुलमोहरासारखे दिसते. चैत्राची चाहूल लागताच त्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. मग हळुहळु देठाच्या बाजूला किंचित तपकिरी रंगाच्या पाकळ्या दिसू लागतात आणि थोड्या दिवसांनी पिवळ्या रंगाच्या फुलांनी साजलेले पूर्ण झाड दृष्टीस पडते. त्याचप्रमाणे गुलमोहर हे झाड सुद्धा अशा प्रकारचे पण ते बहरते वैशाखात. शाल्मली, पळस, पांगारा, नीलमोहर सारखी झाडे चैत्राच्या आगमनाच्या स्वागतासाठी तयार होऊन सजलेली असतात.
चैत्राच्या आगमनाने कुठल्याही झाडाला फुटणाऱ्या पालवीचे रूप फार मनोहर व सुंदर असते. इथे आपण पिंपळाचे झाड पाहू. शिशिरात त्याची सर्व जुनी पाने गळून जातात पण चैत्राच्या आगमनाच्या चाहूलीने गळता गळता नवीन पालवी फुटते. सुरुवातीला त्या पालवी नजरेला दिसत नाहीत. हळुहळु नवीन पाने आल्यावर भडक गुलाबी पाने चमकू लागतात आणि चैत्रामध्ये ते झाड पूर्णपणे बहरते आणि सुंदर फुले त्या झाडावर फुलली आहेत असे वाटू लागते. अशीच किमया मला नारळाच्या झाडामध्ये सुद्धा दिसली. तसे पाहिले तर नारळाची झाडे बारा महिने हिरवी आणि फळांनी बहरलेली असतात. सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत म्हणतात की या झाडाला सुद्धा वसंत ऋतूत पालवी फुटतात. मी हे स्वतः अनुभवले आहे कारण मुंबईला माझे घर तिसऱ्या मजल्यावर आहे आणि आमच्या घरासमोर दोन नारळांची झाडे होती. इथे दुर्गाबाई लिहितात की जेव्हा फाल्गुनच्या शेवटच्या आठवड्यात चैत्राची चाहूल लागल्याप्रमाणे त्यांच्या माथ्यावर एकदम फिक्या रंगाचे जावळ भुरभूरल्यासारखे वाटते. मग त्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्यावर होडीच्या आकाराचे पेंव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेंवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात आणि चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. त्या पुढे लिहितात की नारळाची फुले टणक असतात तरीसुद्धा त्यांचा टणकपणा जाणवत नाही आणि पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने आपली बोटे सुखवतात. त्यावेळी नारळाच्या प्रचंड झाडापुढे हे नखा एवढे फुल पाहून मोठी गंमत वाटते! अशीच गंमत असते आंब्याच्या झाडांची. माघ महिन्यापासून आंब्याच्या झाडाला मोहर येतो आणि चैत्राच्या आगमनाच्या वेळेस पालवीचे घोंसच्या घोंस लागतात. त्याचा एक वेगळाच सुगंध चैत्राच्या आगमनाची सूचना देत असतो.
चैत्राची चाहूलच मनाला एक आनंद देऊन जाते. होळी आणि रंगपंचमी झाली की आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतो आणि सृष्टी एक प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी सजू लागते. गुलमोहर, सोनमोहर, नीलमोहर ह्या झाडांना फुलांचे सडे लागतात तर फळांचा राजा ह्याच काळात मोहरू लागतो आणि फळतो. झाडांना पल्लवीत करणारा, फळांना गोडवा आणणारा आणि फुलांचा सुगंध पसरवणारा चैत्र येऊ लागतो तेव्हा मन खूपच प्रसन्न होत असते. चैत्राची ओळख म्हणजे फक्त उन्हाच्या झळा नव्हे. चैत्राची चाहूल म्हणजे एक सृजनशीलता किंवा जगण्यासाठी मिळालेली नवीन उमेद. त्यात होणारी फुलांची बरसात आपल्या जीवनात नवीन उत्साह निर्माण करते. म्हणूनच ह्या महिन्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात
जैसे ऋतुपतीचे द्वार | वनश्री निरंतर
बोळगे फळभार | लावण्येसी ||
धन्यवाद
Comments
Post a Comment