Skip to main content

Bhasha Shuddhi ani Savarkar: भाषाशुद्धी आणि सावरकर (मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी भाषातज्ञ वि. दा. सावरकर यांचे योगदान वर्णन करणारा अभ्यासपूर्ण लेख)📝

 

*रंग लेखणीचे परिवार*

*आठवडा क्रमांक : 130*

*विषय क्रमांक : 1*

*विषय : भाषाशुद्धी आणि सावरकर (मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी भाषातज्ञ वि. दा. सावरकर यांचे योगदान वर्णन करणारा अभ्यासपूर्ण लेख)📝*

*दिनांक : 13/04/2021*

*शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई*

स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यातील एक अभिजात क्रांतिकारक आणि बुद्धीप्रामाण्यवादी नेते. भारतीय स्वातंत्र्यातील त्यांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेले वैचारिक आंदोलन ह्याचा आढावा घ्यायचा असेल तर त्याची विभागणी पाच भागात करावी लागेल तरच त्यांच्या विचारांची ओळख व्यवस्थित समजून घेण्यास मदत होते. पहिल्या भागात म्हणजे 1912 पर्यंत त्यांनी प्रगल्भपणे रचलेली सशस्त्र क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र आणि अखिल भारतीय पातळीची योजना. दुसऱ्या भागात म्हणजे 1912 ते 1924 चा कालखंड म्हणजे त्यांनी अंदमानात भोगलेल्या यातनामय शिक्षेचा आणि निर्माण केलेल्या मराठी साहित्याचा कालखंड. तिसऱ्या भागात म्हणजे 1924 ते 1937 चा कालखंड त्यात त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा आणि भाषाशुद्धी सारख्या अनमोल कार्यांचा. चौथा कालखंड 1937 ते 1947 पर्यंतचा आणि पाचवा कालखंड 1947 ते 1966 पर्यंतचा. शेवटच्या दोन कालखंडात त्यांनी हिंदू महासभेत राहून केलेल्या राजकीय कार्यांचा उल्लेख आढलेल. इथे आम्ही लक्षात घेणार आहोत त्यांनी केलेल्या एका समृद्ध कार्याचा. ते म्हणजे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा.

ज्ञानेश्वर माऊलीने मराठी भाषेचे मोठेपण सांगताना म्हटले, "माझा मराठीचि बोलु कौतुके | परी अमृतातेही पैजाशी जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ||". सर्व सामान्य माणसाला समजून देताना अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे ज्ञानदेवांच्या मुखातून व्यक्त झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा शुद्ध मराठी भाषेतील शब्दांचा कोश तयार करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्याचप्रमाणे रघुनाथ पंडित यांनी इतरांची मदत घेत मराठी भाषेचा राजव्यवहारकोश तयार केला. इस्लामी आक्रमनाने आणि ब्रिटिश राज्यामुळे अनेक फारशी आणि इंग्रजी शब्द मराठी भाषेत रूढ होत गेले आणि अनेक मराठी शब्द मागे पडले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफमसाला, गुलकंद, अत्तर हे शब्द मराठी भाषेतील नसून अरबी आणि फारशी भाषेतून मराठी भाषेत समाविष्ट झाले. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली असे अनेकजन मानू लागले. पण स्वातंत्र्यावीरांना हे मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी मराठी भाषेच्या शुद्धिकरणासाठी परिणामकारक चळवळ सुरु केली आणि 1925 च्या एप्रिल नि मे या दोन महिन्यात केसरी ह्या वृत्तपत्रातून या विषयावर एक लेखमाला लिहिली. त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

याच विषयावरून त्यांचा अनेक लेखक आणि विचारवंताशी वादही झाला. त्यात दत्तो वामन पोतदार आणि माधव ज्युलियन सुद्धा होते. तेव्हा स्वातंत्र्यविरांनी  त्यांना ठणकावून सांगितलं की परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले ही आमची विजयी चिन्हे नसून आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत. जर आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असताना दुसऱ्या भाषेतील शब्दांचा आधार का घ्यावा असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचावंतास विचारून ते पुढे म्हणतात जेव्हा आपण निरूपाय म्हणून किंवा ऐट म्हणून आपल्या बोलण्या-लिहिण्यात परकीय शब्द वापरतो आणि ते शब्द अधिकतेने वापरले तर त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडून परके शब्द आपल्या भाषेत घट्ट रुतून बसतात. त्यासाठी ते म्हणतात की घरात असलेली सोन्याची वाटी फेकून चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे आहे.जेव्हा अनेक विचारवंत सांगू लागले की संस्कृतप्रचूर शब्द हे समजण्यास आणि उच्चारण्यास कठीण असल्यामुळे हे परभाषी सोपे सर्व सामान्यांना जवळचे वाटू लागले. तेव्हा सावरकरांनी अनेक मराठी सोपे शब्द शोधून काढले आणि वापरण्यासाठी सुचवलेही. त्यातूनच मराठी भाषेतील सौंदर्य वाढण्यास मदत झाली.

भाषा म्हणजे फक्त संवादचे माध्यम नव्हे. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे आणि त्यातून संस्कार घडत असतात. आज मी अनेक ठिकाणी आजची तरुण पिढी चुकिचे मराठी बोलत असताना पाहत असतो, तेव्हा मला सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचारांची आठवण येते. मला हा पेन भेटला, आज येताना मला कुत्रा भेटला असे काहीतरी विचित्र मराठी बोलल्यानंतर आपण काय बोलावे हे सुचत नाही. आजच्या तरुण मुलीतर मी आली, मी गेली असे शब्द घालून मराठी भाषा बोलत असतात तर काही लोक आपली ऐट सिद्ध करण्यासाठी आज माझ्या वाइफला बरे नाही आहे किंवा माझे फादर आज सिंगापूरला गेले आहेत, अश्या प्रकारे मराठीत बोलतात तेव्हा खूपच वाईट वाटते. प्रत्येक राष्ट्राने आपली भाषा जिवंत तर ठेवलीच पाहिजे पण तिचा अमोलिक वारसा सुद्धा जपला पाहिजे. सुप्रसिद्ध लेखक धनंजय कीर आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या पुस्तकात फ्रॅंक एच कॅलन ह्याच्या Excellence In English ह्या ग्रंथाचा उल्लेख करताना कॅलन ह्यांचे विचार सांगतात. कॅलन म्हणतो बालपणी जिच्या अंगाखांद्यावर खेळलो आणि बागडलो त्या आपल्या प्रिय जन्मभूमीला इजा करणारे आक्रमण झाले तर आपण त्या आक्रमणाचा प्रतिकार करतो आणि आपल्या मातृभूमीची एकता आणि सुंदरता टिकली पाहिजे ह्यासाठी आपण दक्ष असतो. त्याच रीतीने आपल्या मातृभाषेचे मूलभूत शुद्धत्व नि वैशिष्ट्य टिकवण्यासाठी आपण कसोशीची दक्षता ठेवली पाहिजे. त्यासाठी कॅलन यांनी इंग्रजी भाषा शुद्धतेचा कार्यक्रम हाती घेतला तसाच कार्यक्रम स्वातंत्र्यवीरानी भारतात मराठी भाषेसाठी घेतला. त्यांनी हेच विचार 1938 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदावरून बोलताना भाषा शुद्धीबद्दल आग्रहीपणे मांडले.

सावरकरांनी अनेक मराठी पर्यायी शब्द सुचवले. त्यातील काही शब्द मी पुढे देत आहे. पण काही शब्दांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो त्यातील एक म्हणजे महापौर ह्या शब्दाचा. गणपत महादेव नलावडे हे हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रांताचे नेते होते. 1942 मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले आणि कालांतराने पुणे महापालिकेचे 'मेयर ' झाले. ही बातमी कळल्यानंतर सावरकरांनी त्यांना चार दिवसांनी पत्र लिहिले आणि त्यात म्हटले, " पत्र पाठविण्यास विलंब होत आहे. त्याबद्दल क्षमस्व. ' मेयर ' ह्या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द मिळाला. " महापौर " हा शब्द अधिक योग्य वाटतो". त्यानंतर महापालिकेच्या महापौर कार्यलयाच्या बाहेरील मेयर ऑफ पुणे ही पाटी जाऊन महापौर ही पाटी लागली. तेव्हापासून महापौर हा शब्द रोजच्या व्यवहारात सहजपणे रूळला गेला. अशीच दुसरी गोष्ट इथे सांगण्याचा मोह आवरत नाही. ती गोष्ट सांगितली आहे  हंस पिक्चरच्या विनायक पेंढारकरांनी. एकदा सावरकर कोल्हापूरमध्ये त्यांच्या स्टुडिओत आले आणि मराठी चित्रपट सृष्टीतीत इंग्रजी शब्दांचा वापर पाहून नाराज झाले. तेव्हा तिकडे बसल्या बसल्या त्यांनी स्टुडिओ, शूटिंग, सिनेमाहाउस, फोटोग्राफर, डायरेक्टर, एडिटर, रेकॉर्डिंस्ट ह्या शब्दांना मराठी प्रतिशब्द दिले ते म्हणजे कलामंदिर, चित्रण, चित्रपटगृह, छायाचित्रक, दिग्दर्शक, संकलक, ध्वनीलेखक इत्यादी प्रतिशब्द दिले आणि कालांतराने ते मराठी भाषेत रूढ झाले. असे अनेक प्रतिशब्द मराठीत त्यांनी आणले ते आहेत शाळा, प्रशाळा, महाविद्यालय, प्रबोधिका, आचार्य, प्राचार्य, प्रध्यापक, प्रवाचक, प्रपाठक, केशकर्तनालय, घड्याळजी, परीटगृह, चिकित्सालय , विधीज्ञ, भोजन निवास गृह, युद्ध, संधी, उपसंधी, शिबीर, टपाल, ग्रंथटपाल, विधिमंडळ , प्रकट, ध्वनीवर्धक, ध्वनी निर्देशक, मुकपट, बोलपट वगैरे असे अनेक प्रतीशब्द त्यांनी मराठी भाषेला दिले. त्यांनी दिलेल्या जबरदस्त योगदानामुळे मराठी भाषेचे सौंदर्य वाढण्यासाठी खूपच मदत झाली.

मित्रांनो, आजची तरुण पिढी मराठी भाषेचा उपयोग फक्त संवाद साधण्यासाठी करतात. त्यात सुद्धा खूप चुका असतात. ह्याचे कारण त्यांनी मराठी भाषेतील साहित्यकृती वाचलेली नसते. त्यामुळे मराठी भाषेच्या सौंदर्याची त्यांना जाणीव नसते. ती जबाबदारी त्यांच्या पालकांची असते. त्यांना आपल्या भाषेचा स्वाभिमान बाळगण्यासाठी शिकवावे लागेल. त्यासाठी भाषेची प्रकृती जपावी लागेल. तुम्ही कुठल्याही माध्यमातून शिक्षण घ्या पण आपल्या मातृभाषेतील म्हणजे मराठी साहित्य वाचून मराठीतील योग्य शब्द वापरण्याचा सराव करा. कारण सावरकरांसारखे द्रष्टे परत निर्माण होत नाही.

ह्या विषयाची सखोल माहिती हवी असल्यास सावरकरांचा भाषाशुद्धी हा ग्रंथ जरूर वाचावा.

धन्यवाद 

 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...