रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : 131
विषय क्रमांक : 4
विषय : असंभव(कथा)
दिनांक : 24/04/2021
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
मुंबईच्या एका नामांकित कंपनीमध्ये गेली पाच वर्षे प्रथमेश ऑडिट विभागात काम करीत आहे. दरवर्षी दोनदा तरी कंपनीच्या इतर भागात कार्यरत असलेल्या शाखेत जाऊन ऑडिट करणे आणि त्याचा वृत्तांत कंपनीच्या वरिष्ठाना देणे हा त्याच्या कार्याचा भाग आहे. त्याप्रमाणे यावेळेस तो छत्तीसगड या राज्यात जाऊन तिकडे कार्यरत असलेल्या शाखांचे ऑडिट करणार होता. त्याची सुरुवात तो बिलासपूर या शहरापासून करणार होता. त्यासाठी मुंबई बिलासपूर रेल्वेने प्रवास करण्यासाठी त्याने मुंबई वरून सकाळी सहा वाजता सुटणारी गीतांजली एक्सप्रेस या ट्रेनचे तिकीट काढले पण ती गाडी बिलासपूरला मध्यरात्री सव्वादोन वाजता पोचत असे. इतर कोणत्याही गाडीचे तिकीट मिळाले नसल्यामुळे त्याला याच गाडीने प्रवास करणे जरुरीचे होते. तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला की एवढ्या मध्यरात्री आपण त्या गावी पोहचल्यावर गावाकडे जाण्यासाठी काही वाहन मिळेल का? मग मनाची तयारी करून त्याने ठरवले की जर वाहन नाही मिळाले तर रेल्वे स्थानकातील विश्रांतीगृहात थांबू आणि मग सकाळी रिक्षा मिळाली की आपण ठरलेल्या हॉटेलमध्ये जाऊ.
त्याप्रमाणे प्रथमेशने सकाळी सहा वाजता मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावरून गीतांजली एक्सप्रेस पकडली आणि आपल्या दुसऱ्या दर्जाच्या वातानुकूलीत डब्ब्यामध्ये स्थिरस्थावर होऊन पुस्तक काढून वाचू लागला. रात्री दोनपर्यंत त्यास आराम होता. गाडी सुरु झाली एकेक स्थानके मागे पडू लागली आणि रात्री आठ वाजता गाडी नागपूर स्थानकात पोहचली. नागपूर सोडल्यानंतर प्रथमेशने रात्रीचे जेवण पूर्ण केले आणि गाडीमध्ये असलेल्या परिचरला बिलासपूर येण्याच्या एक तास अगोदर उठवायला सांगितले आणि तो झोपून गेला. त्याप्रमाणे परिचरने त्याला उठवले आणि सर्व सामानाची आवराआवर करून तो बिलासपूर येण्याची वाट पाहत होता. बिलासपूर रात्री अडीच वाजता आले आणि गाडीतून उतरून तो बाहेर पडण्यासाठी असलेल्या गेटपाशी आला. बिलासपूर स्थानकावर तशी काहीच गर्दी नव्हती. जी माणसे उतरली होती ती त्यांच्या स्वतःच्या कारमधून निघून गेली होती. तिकीटचेकरला तिकीट दाखवून तो बाहेर आला पण त्याला गावात हॉटेल मध्ये जाण्यासाठी एकही वाहन दिसत नव्हते. तिकीटचेकरला विचारून तो रेल्वे स्थानकातील विश्रांतीगृहाकडे जाऊ लागला, तेव्हा त्याला एक व्यक्ती त्याच्याकडे येत असलेली दिसली. तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे न पाहता प्रथमेश विश्रांतीगृहात गेला. विश्रांतीगृहात तेव्हा कोणीही नव्हते. आपले सामान खाली ठेवून तो शांतपणे आपल्या मोबाईलवर आलेले मेसेजेस वाचत होता. ते वाचत असताना त्याला आपल्या बाजूला कोणीतरी बसल्याचा भास झाला म्हणून त्याने तिकडे बघितल्यावर त्याला जाणवले की मगाशी जी व्यक्ती त्याच्या दिशेने येताना दिसली होती तीच व्यक्ती त्याच्या बाजूला बसली होती.
त्या व्यक्तीने प्रथमेशकडे पाहून स्मित केले आणि नंतर नमस्कार करून त्याच्याशी हिंदी भाषेतून संवाद साधायला सुरुवात केली. त्या व्यक्तीने आपला परिचय करताना सांगितले की त्याचे नाव आहे ऋषिकेश उगेमुगे. मग तो पुढे सांगू लागला की मै इधर बिलासपूर मै रहता हूं | आज मेरा परिवार नागपूरसे आनेवाला है, इसलिये मै उनको लेने आया था | इधर स्टेशन मे आने के बाद मुझे पता चला उनकी ट्रेन चार घंटे लेट हो चुकी है | यहासे मेरा घर दूर है, इसलिये मै इधर रुक गया | आप को कोई दिक्कत नही तो इधर बैठ जाता हूं | हे ऐकल्यावर प्रथमेशने त्यास बसण्यास सांगितले आणि स्वतःचा परिचय करून दिला. मै मुंबईसे आया हूं और मेरा नाम है प्रथमेश कुलकर्णी है. तेव्हा त्या व्यक्तीने प्रथमेशला विचारले की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का? प्रथमेशने हो सांगताच त्यांचा संवाद मराठीतून सुरु झाला. हृषीकेश उगेमुगेने त्यांस सांगितले की ते नागपूरचे. ते बँकेत कामाला असून त्यांची बदली बिलासपूरला झाली. सुरुवातीला ते एकटे आले आणि आता त्यांचे कुटुंबीयसुद्धा येत आहेत. एवढ्या दूरवर हिंदी प्रांतात एक मराठीतून बोलणारी व्यक्ती भेटली म्हणून प्रथमेशला खूप आनंद झाला आणि त्याने ऋषिकेश उगेमुगेशी संवाद सुरु केला.
ऋषिकेश उगेमुगे त्यास सांगू लागले की ते नागपूरचे. त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती. त्यांना दोन मोठया बहिणी असून एक धाकटा भाऊ आहे. आर्थिक परिस्थिती जरी चांगली नसली तरी त्यांच्या वडिलांनी खूप मेहनत घेहून सर्व मुलांना शिकविले आणि दोन बहिणींचे लग्ने लावून दिली. आता एक बहीण अमरावतीत असते तर दुसरी वाशीममध्ये. मी स्वतः फायनान्स घेऊन MBA केले आणि बँकेमध्ये नोकरी करू लागलो. नागपूरमध्ये ते म्हणजे ऋषिकेश, त्यांचे आई वडील, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले असे एकत्र राहत असून त्यांचा धाकटा भाऊ नोकरी निमित्ताने पुण्यात स्थायिक झाला. आता आम्ही सर्वजण सुखी असून आनंदात आहोत असे त्यांनी प्रथमेशला सांगितले. एक वर्षापूर्वी त्यांची बदली बिलासपूरला झाली आणि मी इथे आलो. आता माझा परिवार सुद्धा येत आहे. त्यानंतर प्रथमेशने स्वतःचा परिचय करून दिला. तो मुंबईला फोर्ट मध्ये काम करीत असून बोरिवली येथे राहतो. त्याच्या बरोबर त्याचे आईवडील असतात आणि तो अजून अविवाहित आहे असे सांगितले. दोघे एकमेकांशी बोलत असताना वेळ कसा गेला हे समजलेच नाही आणि बाहेर सायकल रिक्षावाल्यांची गडबड सुरु झाल्याची जाणीव होऊ लागली. मग प्रथमेशने त्यांना भेटल्याचा आनंद व्यक्त केला आणि आपले सामान घेऊन बाहेर जाण्याऱ्या गेटकडे चालू लागला. ऋषिकेशसुद्धा त्याबरोबर चालू लागले आणि त्यास म्हणाले बाहेर सिगारेट मिळेल का बघतो. तेव्हा प्रथमेशने त्यांना त्याच्याकडे असलेली सिगारेट देऊ केली पण सिगरेटचा ब्रँड माझा वेगळा आहे असे त्याने सांगितले. त्यास त्यांनी होकार दिला आणि गेटच्या बाहेर येऊन दोघांनी सिगारेट्स ओढल्या.
मग सायकल रिक्षा करून प्रथमेश ठरलेल्या हॉटेलमध्ये आला. हॉटेलमध्ये रूम मिळाल्यावर मस्त झोप काढून फ्रेश होऊन प्रथमेश ऑफिसमध्ये गेला. दिवसभर बिलासपूर शाखेचे काम पूर्ण करून दुसऱ्या दिवशी सकाळी त्यास रायपूरला जाणे भाग होते. बिलासपूर शाखेतील सर्व कामे दुपारी तीन वाजेपर्यंत त्याने संपवली आणि सर्व लागणारी कागदपत्रे एकत्र करून आपल्या बॅगेत व्यवस्थित ठेऊन तो त्या शाखेतील काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याबरोबर दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडला. ऑफिसच्या बाहेर जात असताना त्याची नजर शाखेमध्ये ठेवलेल्या एका वर्तमानपत्राकडे गेली. त्यात त्याला काल मध्यरात्री भेटलेल्या ऋषिकेश उगेमुगेचा फोटो दिसला म्हणून त्याने ते वर्तमानपत्र उचलले आणि वाचू लागला. त्यात बातमी होती. SBT बँक के प्रबंधक ऋषिकेश उगेमुगे कि कार दुर्घटना मे मौत! मग प्रथमेशने त्या वृत्तपत्राची दिनांक पहिली तर ती मागील आठवड्याची होती. ही बातमी वाचल्यावर प्रथमेशने त्याच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्याला या बातमी बद्दल विचारले. तेव्हा त्याने सांगितल्यावर प्रथमेशला त्याच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला. त्याच्या सहकाऱ्याने सांगितले की ऋषिकेश उगेमुगे इथे असलेल्या SBT बँकेचा शाखा प्रबंधक होता. सुरुवातीला तो एकटा इथे आला. मागावून त्याने आपल्या कुटुंबियांना बोलवून घेतले पण त्याचे सर्व कुटुंबीय बिलासपूर येण्या अगोदर मोठया रेल्वे अपघातात मरण पावले. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे ऋषिकेश उगेमुगे दारू पिऊ लागले आणि एक दिवस नशेत गाडी चालवत असताना त्यांची गाडी समोरच्या ट्रकला आपटली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट बरोबर एक आठवड्यापूर्वी घडली होती.
हे सर्व ऐकल्यानंतर प्रथमेश खूपच हादरला. कसेबसे जेवण संपवून तो आपल्या सहकाऱ्याबरोबर परत ऑफिसमध्ये आला आणि काल घडलेला प्रसंग त्याने आपल्या सहकाऱ्याला सांगितला. तेव्हा त्याने प्रथमेशला हा प्रकार असंभव असल्याचे सांगितले आणि कुणाकडे न बोलण्यास सांगितले. प्रथमेशने मान्य केले. मग पूर्ण रात्र तो विचार करत घालवली. दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन रायपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसला तरीसुद्धा काल घडलेला प्रसंग खरा होता हे जरी कोणास सांगितले तर लोक त्यास वेड्यात काढतील म्हणून त्याने गप्प राहण्याचे ठरवले. रायपूरला हॉटेलमध्ये आल्यावर एक सिगरेट पेटवली आणि काल रात्री घडलेला असंभव प्रकार आठवू लागला. मग त्याने या प्रसंगाची कुठेही वाच्यता न करता, तो प्रकार पूर्णपणे लिहून काढला आणि त्यास नाव दिले असंभव.
धन्यवाद
Comments
Post a Comment