*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक : 125*
*विषय क्रमांक : 2*
*विषय : स्वयंसिद्धा व्यक्तीचित्रण📝*
*दिनांक : 09/03/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
स्वयंसिद्धा म्हणजे स्वकर्तृत्वाने विकसित
झालेली व्यक्ती. अशा अनेक व्यक्ती भारतात आणि जगात होऊन गेल्या आहेत. अश्या
व्यक्तीपैकी एक अशी व्यक्ती आहे कमलादेवी चट्टोपाध्याय.
कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या एक
स्वयंसिद्धा राष्ट्रीय प्रतिमा होत्या.आज हे नाव बहुतेक भारतीय लोकांना
माहितसुद्धा नाही. पण त्यांनी केलेली निर्मिती इतिहासात ठळकपणे नोंदली गेली आहे.
त्यांची ओळख फक्त भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक धडाडीच्या कार्यकर्त्या
एवढीच नसून त्या समाजसुधारक,
परिपूर्ण राजकीय विचारवंत, महिला चळवळीतील स्वातंत्रवादी स्त्री,
नाटक व साहित्याच्या समर्थक आणि हस्तकलाप्रांतातील
नवीन निर्मितीसाठी तळमळीने काम करणाऱ्या जबरदस्त कलाकारपण होत्या. डॉ. ऍनि बेसेन्ट
आणि महात्मा गांधी ह्या दोन व्यक्तिमत्वामुळे त्या प्रेरित झाल्या आणि त्यांच्या
आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून गेली. भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा पुरुषांपुराता
मर्यादित न ठेवता स्त्रीवर्गास ही वाव द्यावा यासाठी महात्मा गांधीस राजी करणाऱ्या
त्या पहिल्या महिला होत्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर विविध क्षेत्रात काम करून
भारतास आधुनिक बनवण्यास त्यांचे योगदान फार मोठे आहे.
कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी आनंथाय आणि गिरीजम्मा धारेश्वर ह्या
पुराणमतवादी सारस्वतब्राह्मण कुटुंबात मंगळूर येथे झाला. त्या भावंडात सर्वात लहान
होत्या. त्यांचे बालपण कधीच सुखाचे नव्हते. त्यांच्या सर्वात जवळ असलेली त्यांची
मोठी बहीण सुगुणा अल्पशा आजाराने किशोर वयातच मरण पावली. त्या सात वर्षाच्या
असताना त्यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक
पेचप्रसंगांचा सामना करावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे
कुटुंब त्यांच्या मामाकडे राहू लागले. त्यांचे मामा समाजसुधारक होते आणि त्यांचा
संपर्क गोपाळ कृष्ण गोखले, श्रीनिवास शास्त्री, पंडिता रमाबाई आणि डॉ. ऍनि बेसेन्ट अशा व्यक्तींबरोबर होता. ह्याचा परिणाम
कमलादेवींच्या मनावर झाला. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांचा कल
सामाजिक विकासाकडे होण्यास मदत झाली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले पण
एका वर्षात त्यांच्या यजमानांचे निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांना आपले शिक्षण
पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सासऱ्यांनी परवानगी दिली.
मंगळूर येथून शालेय शिक्षण पूर्ण करून
त्या पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी चेन्नईत गेल्या. तिथे त्यांनी क्वीन मेरी
कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे शिकत असताना त्यांची ओळख सरोजिनी नायडूंचे भाऊ
हरिन्धनाथ चट्टोपाध्यायशी झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यानी लग्न
केले. एक वर्षानंतर त्यांच्या एकुलता एक मुलाचा म्हणजे रामचा जन्म झाला.
हरिन्धनाथाबरोबर त्यांनी नाटक निर्मितीचे स्वप्न पुरे केले आणि सामाजिक विषय
असलेल्या नाटकांना प्रसिद्धी देण्याचे काम त्यांनी केले. प्रसिद्ध संस्कृत नाटककार पंडित
श्री मणी माधव चाकीयार यांच्याकडून त्यांनी केरळ- कुट्याअट्टम संस्कृत नाटक
परंपरेचा अभ्यास केला. त्यांनी अनेक लोकनाट्य आणि प्रादेशिक नाटकांचे प्रयोग केले
आणि काही मूक चित्रपटात कामहि केले. लग्नानंतर हरिन्धनाथ आणि कमलादेवी लंडनला गेले
आणि तिथे कमलादेवीने बेडफोर्ड ह्या महाविद्यालयातून समाजशास्त्राची पदवी घेतली.
लंडनमध्ये असताना हरिन्धनाथ आणि कमलादेवीने मैत्रीपूर्वक वेगळे होण्याचा निर्णय
घेतला.
इ. स.1923 मध्ये महात्मा गांधीने ब्रिटिश सरकार
विरुद्ध असहकार चळवळ सुरु केली. कमलादेवीना हि बातमी वाचून आनंद झाला आणि प्रेरित
होऊन ह्या आंदोलनात भाग घेण्यासाठी त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्यांनी राष्ट्र सेवा दलात स्वतःचे नाव नोंदवले आणि त्या महिला
विभागाच्या प्रमुख झाल्या. राष्ट्र सेवा दलात असताना त्यांनी स्त्रियांना आणि
मुलींना शिक्षण देण्याचे महत्वाचे काम केले. त्यासाठी त्यांनी पूर्ण भारत प्रवास
केला आणि अनेक स्रियांना राष्ट्र सेवा दलात सामील करून घेतले. त्याकरिता त्यांनी
भारतीय महिला परिषदेची स्थापना केली आणि त्या परिषदेच्या सरचिटणीस झाल्या. पुढे हि
परिषद एक राष्ट्रीय संघटना झाली. सरचिटणीस झाल्यावर त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न
हाती घेऊन महिलांसाठी जरुरी असणाऱ्या सामाजिक सुधारणांच्या कल्याणकारी
कार्यक्रमांची मांडणी तर केलीच पण महिलांना शिक्षण देण्याऱ्या संस्थांना मदत
मिळण्यासाठी त्यांनी युरोपीयन देशांचा यशस्वी दौरा केला.
पुन्हा एकदा 1930 मध्ये महात्मा गांधीने ब्रिटिश सरकारविरुद्ध मिठाचा सत्याग्रह सुरु केला.
त्यासाठी त्यांनी महात्मा गांधींची भेट घेतली आणि हा सत्याग्रह पुरुषांपूरता
मर्यादित न ठेवता स्त्रियांना सुद्धा चळवळीत भाग घेण्यासाठी महात्मा गांधींचे मन
वळवले आणि त्यांची संमती मिळवली. मग त्यांनी अवंतिका गोखले ह्यांना बरोबर घेऊन
मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये जाऊन मिठाची विक्री केली आणि महात्मा गांधींचा
जयजयकार केला. कमलादेवीना अटक करण्यात आली आणि भारताच्या स्वातंत्र्याचळवळीत अटक
होणारी त्या पहिल्या महिला होत. तसेच त्या निवडणूक लढवणाऱ्या पहिल्याच महिला आहेत.
मिठाच्या सत्याग्रहाच्या अगोदर मद्रास प्रेसिडेंसीने महिलांना निवडणुकीत उभे
राहण्यासाठी विधेयक आणले होते. कमलादेवी अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या आणि
अरुंद फरकाने निवडणूक हरल्या. पण त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्थरावर प्रसिद्धी
मिळून त्या राष्ट्रीय नेत्या बनल्या.
1936 साली त्या काँग्रेस समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष्या
झाल्या आणि त्यांना राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या सोबत काम करण्याची
संधी मिळाली. 1942 च्या भारत छोडो ह्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि
त्यांना पुन्हा अटक झाली. जरी त्यांनी छोडो भारत आंदोलनात भाग घेतला असला तरी
त्यांचा महिला चळवळीपासून दूर गेल्या नव्हत्या. त्यासाठी त्या अमेरिका आणि
युरोपीयन देशात जाऊन तेथील महिलांचे प्रश्न समजण्याचा प्रयत्न केला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर कमलादेवीने
औपचारिक राजकारणात प्रवेश करण्यास नकार दिला आणि राजदूत, केंद्रीय मंत्री, राज्यपाल व उपराष्ट्रपती सारखी पदे नाकारली आणि
स्वतःला मानवतेच्या सेवेमध्ये झोकून दिले. भारताच्या विभाजनानंतर अनेक
निर्वासितांना पुनर्वसन करण्यासाठी अनेक योजना तयार केल्या. त्यासाठी त्यांनी
सहकार तत्वावर घरे बांधण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी भारतीय सहकारी संघ
स्थापन केले. भारतीय सहकारी संघटनेने दिल्लीच्या हद्दीत औद्योगिक वसाहत तयार केली, तेथे कार्यशाळा व कारखाने उभारले
आणि आज ते शहर फरीदाबाद ह्या नावाने
ओळखले जाते.
1950 नंतर त्यांनी भारतातील सुंदर, श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण हस्तकला परिपूर्ण करण्यासाठी श्रम घेतले. हि
पारंपरिक कला शिकण्यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. त्यात त्यांनी शिल्पकला, विणकाम, कुंभारकाम व खेळणी बनवण्याची कला समजून घेतली. ह्या
कलेला वाव मिळण्यासाठी किंवा त्यांच्या विक्रीला चांगले भाव मिळण्यासाठी त्यांनी Central Cottage Industries Emporium
and Crafts Council of India ची स्थापना केली आणि स्वतः प्रमुख
म्हणून वीस वर्षे काम केले. त्याच प्रमाणे त्यांनी कला,संगीत, नृत्य,
नाटक आणि कठपुतळी ह्यांच्या विकासासाठी
अनेक संस्था उभारून फार महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ
ड्रामा, संगीत नाटक अकादमी, अखिल भारतीय हस्तशिल्प मंडळ अशा अनेक
संघटना उभारल्या. त्याशिवाय त्यांनी कुशल कलाकारांसाठी राष्ट्रीय
पुरस्कारांचीसुद्धा स्थापना केली.
कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या उदारमतवादी, लोकशाहीवादी आणि समाजसुधारक होत्या. आधुनिक भारताच्या विकासासाठी त्यांनी
केलेल्या महत्वाच्या योगदानामुळे त्यांना 1955
साली पद्माभूषण आणि 1987 साली पद्माविभूषणने गौरवण्यात आले. 1974
साली त्यांना संगीत नाटक अकादमीतर्फे
रत्न सदस्या आणि शांतीनिकेतनतर्फे देशी
कोट्टमा ह्या पदव्या देण्यात आल्या. 1966 रोजी त्यांना सामुदायिक नेतृत्वासाठी Ramon Magsya पुरस्कार
देण्यात आला तर हस्तकला विकसित केलेल्या योगदानाबद्दल युनेस्कोने त्यांना युनिमा (Union International De La Marionette )
असा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
कमलादेवी ह्यांचे मराठी, कन्नड, तामिळ,
तेलगू, हिंदी, संस्कृत, कोंकणी आणि इंग्रजी अशा आठ भाषांवर
प्रभुत्व होते. त्या एक जबरदस्त लेखिकापण होत्या. त्यांनी जवळपास वीस पुस्तके
लिहिली असून त्यापैकी बरीच पुस्तके त्यांच्या वेगवेगळ्या देशांच्या
भेटीदरम्यानच्या अनुभवाविषयी लिहिली आहेत.
कमलादेवी चट्टोपाध्याय एक महान भारतीय
व्यक्तिमत्व होत्या. 29 ऑक्टोबर 1988
ह्या दिवशी वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने
भारताला आधुनिक बनवण्यासाठी जे योगदान दिले,
अशा व्यक्तीस आम्ही पूर्णपणे विसरलो
आहोत आणि महिला दिनाच्या दिवशी सुद्धा कोणी आठवण ठेवत नाही.
ह्या महान भारतीय स्त्री व्यक्तिमत्वला
त्रिवार सलाम
धन्यवाद
Comments
Post a Comment