*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक : 124*
*विषय क्रमांक : 1*
*विषय :मदांध 📝*
*दिनांक : 03/03/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
मदांध म्हणजे गर्विष्ठ किंवा घमेंडखोर अथवा विद्येने, संपत्तीने, सत्तेने आलेला उन्मतपणा. मदांधपणा ही एक सार्वत्रिक समस्या आहे आणि ती समस्या प्रत्येक मानव जातीमध्ये थोडया किंवा जास्त प्रमाणात दिसून येते. ती मानवामध्ये निर्माण होण्याचे कारण त्याचा स्वतःबद्दलचा असलेला आंधळा अभिमान. हा अभिमान त्याला सत्य गोष्टी माहित करून घेण्यापासून प्रतिबंधित करतो. जेव्हा मानव स्वतःच्या शिक्षणामुळे किंवा मिळालेल्या संपत्तीमुळे स्वतःला सर्वश्रेष्ठ मानू लागतो तेव्हा त्याचा गर्विष्ठपणा किंवा मदांधपणा खूप वाढत जातो असे म्हणतात आणि हाच मदांधपणा त्याचा सर्वनाश होण्यास कारणीभूत होतो. म्हणूनच परिपूर्ण आणि फलदायी जीवन जगताना आपल्याला सर्वात धोकादायक शत्रूशी सामना करायचा असतो. तो धोकादायक शत्रू म्हणजे मदांधपणा किंवा गर्विष्ठपणा. सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि मूर्तिपूजक Clive Staples Lewis आपल्या एका लेखात म्हणतात, "मदांध हा एक अध्यात्मिक कर्करोग असून मानवी मनाची ईश्वर विरोधी अवस्था आहे. त्यातून मानवाचा फक्त विनाशच होत असतो".
मदांध किंवा गर्विष्ठ ह्या समस्यावर मात करायची असेल तर मानवाला स्वतःमध्ये नम्रता निर्माण करावी लागेल कारण मदांध नेहमी असत्य गोष्टी कडे लक्ष केंद्रित करतो तर नम्रता सत्य गोष्टीकडे नेत असते. किंग सोलोमन हा जगामधील सर्वात श्रीमंत आणि विद्वान राजा समजला जातो. तो मदांध किंवा गर्विष्ठ बद्दल म्हणतो," Pride goes before destruction, a haughty spirit before a fall ". म्हणजे मदांध किंवा गर्विष्ठ माणसाला पापाचा धोका अधिक असतो आणि म्हणूनच त्याला त्याची शिक्षा लगेच मिळते. ह्याचे कारण मदांधपणा माणसामध्ये गैरसमज लगेच पसरवून तो मानवी जीवन कमकुवत करतो. जर ह्या गोष्टीपासून माणसाला दूर राहायचे असेल तर त्याला नम्र व्हावे लागेल. नम्र होणे म्हणजे कमकुवतपणा नव्हे. त्यासाठी मानवाला ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सत्याचा शोध घ्यावा लागेल. शोधा म्हणजे सापडेल ह्या म्हणीचा अर्थ समजून घेऊन मदांधपणावर मात करावी लागेल.
मदांध बरोबर लढायचे असेल तर मानवाने सत्य शोधण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण प्रार्थना आपल्याला नम्र होण्यास मदत करते आणि सत्याची बाजू दाखवून देते. प्रार्थना आपल्याला इतरांची सेवा करावयास शिकवते. त्यातून आपण सत्याच्या वाटेवर नकळत जात असतो. ह्यासाठी बुद्ध, ख्रिस्त आणि महात्मा गांधी ह्यांचे जीवन चरित्र बघा. त्यांनी आपला मदांधपणा आणि आपला गर्व किंवा अहंकारपणा त्यागून स्वतःचे जीवन मानवाच्या सेवेत अर्पण केले. ह्या महामानवांना दुसऱ्यांची सेवा करताना सर्व जगाला प्रेमाचा सुंदर संदेश दिला आहे आणि स्वतः नम्र होऊन लोकांची सेवा करण्याचे व्रत घेतले. जेव्हा लोकांना समजत नाही की ते मदांधपणामुळे अंध झाले आहेत आणि त्यामुळे त्यांचे पतन होणार आहे, तेव्हा त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ह्या महापुरुषांची माहिती जरूर द्यावी.
जेव्हा आपण उच्च शिक्षिण घेत असाल तर आपल्या शिक्षणाचा उपयोग आपले ज्ञान वाढवण्यासाठी करावा. जर आपल्या उच्च शिक्षणामुळे आपण मदांध झालात तर जे शिक्षण आपण घेतले त्याचा उपयोग आपणास न होता आपण ज्ञानापासून दूर होत जाल. कारण शिक्षण म्हणजे फक्त पदवीधर होणे नसून ज्ञानाचा शोध घेणे. आपण ज्ञान शोधण्याचे खरे कारण म्हणजे आपण बरोबर आहे याची पुष्टी करणे आणि ज्यांनी चुकीचे संदर्भ देत खोटी माहिती दिली असेल तर ते चुकीचे आहे हे सिद्ध करणे. त्यामुळे मदांध माणूस तुमच्यावर चिडेल तरी सुद्धा तुम्ही सत्याची कास सोडता कामा नये कारण मदांध माणसाचा अखेर पराभव निश्चित आहे.
सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत Thomas Tarrants आपल्या Pride and Humilty पुस्तकात लिहितात की परमेश्वर नम्र लोकांवर कृपा करतो आणि मदांधाचा प्रतिकार करतो कारण गर्व किंवा मदांध आंधळा असतो. ते पुढे लिहितात की मदांध हा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही, जे जुने आहे त्याच गोष्टीचा वापर करत राहतो. तो स्वतःच्या पलीकडे जास्त कल्पना करू शकत नाही. त्यासाठी थॉमस लिहितात की परमेश्वर सुद्धा मदांध माणसाशी अगदी भिन्नपणे वागतो. तो त्यांच्यावर कधीही कृपा करत नाही. भगवदगीते मध्ये सुद्धा श्रीकृष्ण मदांधपणा किंवा गर्विष्ठपणा असणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण असल्याचे सांगतात आणि त्या व्यक्तीस ते अपरिपक्वतेचे स्वरूप मानतात.
मदांध किंवा गर्व आंधळा आहे. तो आपल्या अंगी जोपासाला तर आपला विनाश नक्की आहे. त्यासाठी त्याचा त्याग करून आपणास नम्र व्हावे लागेल आणि ज्ञानाच्या मार्गाने जाणे हेच आपल्या समाजाच्या प्रगतीचे महत्वाचे आहे.
धन्यवाद
Comments
Post a Comment