*रंग लेखणीचे परिवार*
*विषय क्रमांक :1*
*विषय : मला समजलेली राज्यभाषा 📝*
*दिनांक : 27/02/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
आज 27 फेब्रुवारी 2021. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटकार आणि कादंबरीकर वि. वा. शिरवाडकर ह्यांचा आज जन्म दिवस आणि हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो तो असा की आज मराठीचे मराठी माणसात नक्की स्थान काय आहे. आजची मराठी पिढी किती मराठी व्यवस्थित बोलते किंवा किती मराठी साहित्य वाचते. आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहित आहे का? असे अनेक प्रश्न पडत असतात. हल्लीच आमच्या इथे एका विशितील तरुणीने पु. ल. देशपांडे आमच्या वडिलांच्या काळातील एक विनोद करणारे गृहस्थ होते असे म्हटले. पण पु. ल. देशपांडेनी मराठीत काही छान पुस्तके लिहिली आहेत हे तिला माहित नाही कारण तिच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचलेली असत नाही. मग कुसुमाग्रजांच्या कविता तर दूरच. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने आम्हाला सोप मराठी समजत पण वाचायला जमत नाही असे मला सांगितले. मग अश्या वेळी एक प्रश्न पडतो की मराठी भाषा, मराठी संस्कार आणि मराठी साहित्य कुठपर्यंत जिवंत राहणार.
आम्ही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे आमची वाट लागली किंवा आम्हाला इंग्रजी बोलता येत नव्हते म्हणून आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले त्यामुळे त्यांना नोकरी मिळवण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. अशी सबब पुढे केली जाते. इथेही मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुले खरोखरच इंग्रजी चांगले बोलू किंवा लिहू शकतात का? त्यांना इंग्रजी साहित्याची माहिती आहे का? फक्त न घाबरता इंग्रजी बोलता येते एवढंच पण बरोबर आहे असे म्हणता येणार नाही. माझा इंग्रजी माध्यमाला विरोध नाही पण आपली भाषा ही आपल्या मुलांना चांगली बोलता यावी यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत का? असे प्रश्न वारंवार मला पडत असतात. माझ्या एका मित्राच्या मुलाने मुंबईच्या इतिहासाच्या अभ्यासाबद्धल काही पुस्तकांची नावे विचारली, तेव्हा मी काही मराठी पुस्तकांची नावे सांगितली तेव्हा त्याने मला मराठी वाचायला जमत नाही, इंग्रजी पुस्तकांची नावे सांग असे सांगितले. तसेच मराठी बोलताना काही तरुण पिढी, " मी आली, मी गेली " किंवा "मला पेन भेटले" असे म्हणतात तेव्हा त्यांचे आईवडील त्यांची भाषा सुधारत तर नाही पण आजच्या पिढीची ती भाषा आहे म्हणून कौतुक करतात तेव्हा वाईट वाटते.अशावेळी मला कवी अनिलांची एक कविता आठवते, "असे मराठी आमुची मायबोली, परंतु राज्यभाषा नसे ". ही कविता त्यांनी महाराष्ट्रराज्य निर्मितीच्या अगोदर केली होती. आज खेदाने थोडासा बदल करून म्हणावसे वाटते," असे मराठी आमुची राज्यभाषा, परंतु मायबोली नसे ".
मित्रहो, मराठी एक परिपूर्ण भाषा आहे. त्यात व्याकरण आहे, वैचारिक क्षमता पण आहे आणि सर्वात महत्वाचे त्यात सर्व प्रकारचे साहित्य (literature ) आहे. तरी सुद्धा आपण मराठीला दुय्यम स्थान का देतो आहे हे समजत नाही. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आणि आज मराठी आणि इंग्रजी दोन्हीही भाषेतून लिहीत असतो, बोलत असतो. सराव केल्याने सर्व गोष्टी सोप्या होतात. त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे व वाचन वाढीवले पाहिजे. अनेक विद्वानांची भाषणे आणि लिखाण वाचली पाहिजे तरच भाषा व्यवस्थितपणे बोलता, लिहिता येऊ शकेल. मी कधीही म्हणत नाही की कोणी इंग्रजी भाषा शिकू नये. ती सर्वांनी शिकावी असेच मला वाटते कारण ती ज्ञान मिळवण्याची एक खिडकी आहे पण खिडकी म्हणजे घर नव्हे. तुम्ही इंग्रजीतून शिका पण त्याचा उपयोग तुमच्या साठी जरूर करा आणि मराठीलासुद्धा तुमच्या व्यवहारात स्थान मिळवून द्या. कारण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि त्यातील साहित्य फार मोलाचे आहे
शेवटी कुसुमाग्रजांच्या कवितेने हा लेख संपवतो.
"माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जगल्या, दऱ्या खोऱ्यातील शिळा ".
धन्यवाद
Comments
Post a Comment