*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक : 122*
*दिनांक : 17/02/2021*
*विषय क्रमांक : 4*
*विषय : धागा 📝*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
धागा हा कापूस, रेशीम किंवा लोकरीचा लांब पातळ तुकडा जो दुसऱ्या धाग्यात आपोआप विणला जातो
किंवा उसवलाही जातो. त्यामुळे बऱ्याचदा हे विणलेले धागे गुंतागुंतीचे होतात आणि
मध्येच उसवतातही. मानवी आयुष्यातील
नाती सुद्धा अश्याच रेशमी धाग्यात विणली गेली आहे. मानवाचे मन सहजरीत्या कुठेही रमते. कोणीही व्यक्ती आपल्या जवळ
येऊन आपल्याला मदत करू लागते तेव्हा ते आनंदीत होते आणि आपली व्यक्ती दूर गेल्यावर
ते दुःखी होते. म्हणून मानव आपली नात्यातील धागे इतकी घट्ट विणतो की ते धागे
सहजपणे उसवले जात नाही. बऱ्याचदा हे धागे उसवतातही. म्हणूनच जगाच्या पाठीवर ह्या
चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यात ग दि माडगूळकर म्हणतात, "एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा, तूझ्या आयुष्याचे".
ह्या गाण्यात त्यांनी मानवी आयुष्याचे
सुख दुःख जरतारीच्या वस्त्रानी कसे विणले गेले आहे हे अतिशय सुंदर मांडले आहे. ग
दि मा.नी ह्या गाण्यात सांगितल्या प्रमाणे मानवाने आपल्या नात्याचे धागे घट्ट तर बांधले पाहिजेत तरीसुद्धा एक धागा उसवला तर नाउमेद न होता नवीन नाती नव्या
उमेदीने परत एकदा नवीन धाग्याने विणली
गेली पाहिजेत.
आपण नेहमी माणसांची नाती म्हणजे फक्त
रक्ताची नाती समजतो. आई वडील,
बहीण भाऊ, पतिपत्नी किंवा आपल्या परिवारातील काही
महत्वाची नाती. काही नाती रक्तासारखी जिव्हाळ्याचीसुद्धा असतात. त्यातसुद्धा
प्रेमाचा आणि वात्सल्याचा एक सुखाचा धागा असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास
मित्रमैत्रिणीचे देता येईल. कारण मैत्रीचे धागे हे आपोआप जोडले जातात, कुणी सांगितले म्हणून जोडली जात नाहीत किंवा कोणी जबरदस्ती केली म्हणून
निर्माण होत नाही. ज्यांना ती नाती दिसतात तीच माणसे ती नाती जपण्यासाठी असे अनेक
धागे घट्ट विणण्याचा प्रयत्न करतात.1915
साली प्रदर्शीत झालेल्या दगडी चाळ ह्या
चित्रपटातील "मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुवा",
हे क्षितिज पटवर्धन लिखित गाणे मानवी
नात्यातील सत्य सांगत माणसाच्या मनाचा धागा त्याला प्रत्येकाशी कसा जोडतो आणि
त्याच्या भावविश्वाचा कसा भाग बनतो हे समजते. अश्या काही विणलेल्या भक्कम
धाग्यांची दोन उदाहरणं पाहू.
पहिले उदाहरण आहे ते म्हणजे भारतीय जनता
पार्टीचे नेते राम नाईक आणि फादर दिब्रितो
ह्यांचे. फादर दिब्रितो हे रोमन कॅथलिक
चर्चचे धर्मगुरू आणि राम नाईक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले भारतीय जनता
पार्टीचे नेते. ह्या दोघांमध्ये जो माणुसकीचा धागा इतका घट्ट विणला गेला आहे की
त्यास तोड नाही. रामभाऊच्या अमृतमहोत्सवी सत्कारानिमित्त महाराष्ट्र टाइम्स मध्ये
लिहिलेल्या लेखात फादर लिहितात की राम नाईक ह्यांच्याशी जडलेल्या स्नेहामागे एक
माणुसकीचा धागा विणला आहे. ते पुढे लिहितात आमच्या दोघांची भेट एका संघर्षामुळे
झाली.23 एप्रिल 1989
रोजी काही समजकंटकांनी एका शेताजवळ
उभारलेला पवित्र क्रूस विद्रुप केला होता. त्यामुळे वातावरण तंग होऊन उद्रेक
होण्याची भीती होती. जेव्हा ही बातमी मी रामभाऊना सांगितली, ते लगेच फादर दिब्रितो समवेत घटनास्थळी आले आणि लोकांना शांत केले आणि
नव्याने क्रूस उभारण्याची जबाबदारी घेतली. तेव्हापासून त्या दोघांमध्ये
भारतीयतत्वाची जोपासना करण्यासाठी एक माणुसकीचा धागा निर्माण झाला तो आजपर्यंत
घट्ट विणला गेल्याचे हे एक सुंदर उदाहरण आहे.रामभाऊ जेव्हा रेल्वेमंत्री होते
तेव्हा औरंगाबाद येथील वैजापूर गावात रेल्वे स्थानक असून सुद्धा देवगिरी ही गाडी
थांबत नसे. फादरनी रामभाऊना त्यासाठी एक पत्र लिहिले आणि गाडी वैजापूर रेल्वे
स्थानकावर थांबू लागली. ज्यावेळी रामभाऊंची तब्येत बिघडली तेंव्हा त्यांच्यासाठी
फादर प्रार्थना करतात ती त्यांच्या पद्धतीने पण ती प्रार्थना त्यांच्या मधील अतूट
मैत्रीचा धागा असते. त्यासाठी फादर म्हणतात की मैत्रीमध्ये परमेश्वर प्रवेश करतो
तेव्हा ती मैत्री निखळ आणि निरपेक्ष होत असते. मग उरतात केवळ माणुसकीचे धागे!
आता दुसरे उदाहरण आहे ते म्हणजे महात्मा
गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नात्यातील धाग्याचे. संत
ज्ञानेश्वरमाऊलीने "भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे" असे त्यांच्यासाठीच लिहिले आहे का असे वाटत राहते.भारतीय स्वातंत्र्याच्या
लढ्यातील अत्यंत प्रभावशाली असलेली हि
दोन व्यक्तिमत्वे. ह्या दोघांच्यामध्ये
एक जबरदस्त धागा विणला गेला होता. त्यांचा अद्वितीय संबंध इतिहासाच्या
अभ्यासकासाठी एक आकर्षक विषय आहे. त्यांची जडणघडण आणि मानसिकता इतक्या वेगळ्या
होत्या तरीसुद्धा ते एकत्र येऊ शकले हा एक योगायोगच आहे. जवाहरलाल गांधीकडे
आकर्षित होण्याचे कारण फक्त स्वातंत्र्याचा लढा नसून, ज्या पद्धतीने त्यांनी जवाहरलाल ह्यांच्या अस्तित्वाला एक प्रकारे आव्हान
दिले आणि त्यांच्या अस्वस्थ मनाला नवीन ऊर्जा दिली हे आहे. गांधींना जवाहरलाल
मध्ये एक प्रामाणिक आणि सत्य जाणणारा माणूस,
अनेक गोष्टीची माहिती असणारा आणि
सर्वाना एकत्र घेऊन जाणारा त्यांचा उत्तराधिकारी सापडला होता. त्यांच्या मध्ये
पुष्कळदा खूपच वादविवाद होत होते तरीसुद्धा त्यामधून मार्ग काढून त्यांनी
दोघांमधला अतूट धागा घट्ट विणला होता. ह्या संबंधाचा सखोल अभ्यास करायचा असेल तर
श्रेष्ठ समजवादी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातील अग्रणी नेते मधु लिमये ह्यानी
लिहिलेले Gandhi and
Jawaharlal : Historical Relationship हे चार
खंडातील पुस्तक वाचावे.
असे धागे फक्त माणसा माणसा मध्ये विणले
जातात असे नसून ते पुस्तकं आणि माणूस,
किंवा संगीत आणि माणूस, खेळ आणि माणूस, वास्तू आणि माणूस वगैरे मध्ये सुद्धा विणले जाऊ
शकतात. आता भारताचे संविधान घ्या. भारताचे संविधान हे सर्व भारतीयांच्या मधील एक
अतूट धागा आहे. त्याचप्रमाणे हिंदी सिनेमा आणि त्यातील संगीत सुद्धा सर्व
भारतीयांना एकत्र आणणारे एक महत्वाचे क्षेत्र आहे आणि त्याचे धागे इतके जबरदस्त
विणले गेले आहेत की भारतात ज्या ठिकाणी हिंदी भाषा नाकारली पण हिंदी सिनेमा आणि
त्यातील संगीत स्वीकारले गेले.
धन्यवाद
Comments
Post a Comment