Skip to main content

Athvanitil Kusumagraj ; आठवणीतले कुसुमाग्रज 📝

 


*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक 123*
*विषय क्रमांक 3*
*विषय : आठवणीतले कुसुमाग्रज 📝*
*दिनांक : 26/02/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*

मला नक्की आठवत नाही, पण मी बहुधा नववीत दहावीत असेन तेव्हा कवी कुसुमाग्रजांची एक कविता आमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात होती. मला ती कविता खूपच आवडली होती आणि आजही मला ती कविता पूर्णपणे पाठ आहे किंवहुना त्या कवितेमुळेच कुसुमाग्रज माझ्या आयुष्यात आले, असे म्हणावयास हरकत नाही. कारण त्या कवितेत दिसलेली कवीची विशाल कल्पनाशक्ती. ती कविता आजही वाचताना असे वाटते की कवीने आपली व्यापक कल्पना शक्तीचा वापर करून एका वैज्ञानिक सिद्धांताला छानपैकी वस्त्राभुषणांनी सजवून एक काव्य निर्माण केले. त्यात त्यांनी सूर्याला प्रियकर केले आणि पृथ्वीला प्रेयसी आणि त्या कवितेस नाव दिले पृथ्वीचे प्रेमगीत. पृथ्वीचे प्रेमगीतमध्ये कुसुमाग्रज पृथ्वी सूर्याकडे कशी प्रीतीची याचना करत आहे असे सांगताना भव्य आणि उदात्त प्रेमाचा दृष्टीकोन सहजपणे मांडतात.पृथ्वी सूर्या भोवती फिरते हा झाला वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अनेक युगे हा दृष्टीकोन तसाच चालत राहणार ह्यात दुमत नाही. पण कुसुमाग्रज आपल्या कवी मनाने त्यात दिव्य प्रेमाचे जबरदस्त दर्शन घडवताना म्हणतात, " युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तूझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना".

कुसुमाग्रज्यांच्या कविता कुठल्याही बंधनात अडकलेल्या दिसत नाही. त्यांनी कविता करताना अनेक विषय हातालेले आहेत. आपल्या कवितेत ते जसे समाजाचे प्रबोधन करतात तसेच वेगळ्या पद्धतीने प्रेमावर सुद्धा कविता करतात. कधी त्यांची कविता देशभक्ती काय आहे सांगत असतानाच समाजातील अनेक विसंगतीही दाखवितात आणि अस्तित्वाचा शेवट पर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न करतात. कुसुमाग्रज आपल्या कवितेतून उत्कट जीवननिष्ठा आणि मानवावरील अपार प्रेमतर दाखवतातच पण अन्यायाचा धिक्कारसुद्धा करतात. त्यांची प्रतिभा ही कल्पक आहे, निर्माणक आहे. म्हणून त्यांच्या कविता प्रचारक होतात. बौद्ध, महात्मा गांधी आणि आंबेडकरांचे  विचार आपल्या कविते मार्फत वाचकपर्यंत पोचवू शकतात. कुसुमाग्रज आपल्या कवितेला रुक्ष समिधा म्हणून संबोधतात आणि ते एका कवितेत म्हणतात " समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा, कोठून फुलांपरी वा मकरंद मिळावा? जात्याच रुक्ष या एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा!".

पृथ्वीचे प्रेमागीत ही कविता त्यांच्या विशाखा ह्या काव्य संग्रहातील. पुढे ते पुस्तक माझ्या वैयक्तिक ग्रंथसंग्रालयात आले. आजही त्यातील अनेक कविता मी बऱ्याचदा वाचत असतो. त्या वाचताना एक गोष्ट नेहमी जाणवते ती म्हणजे जे उदात्त आहे ते सर्व त्यांच्या काव्यात आहे. कुठेही निराशा किंवा मलिनता नाही. त्यातील आशय, अर्थ  आणि रचना एकमेकांना पूरक असतात. त्या काव्य संग्रहातील अशीच एक कविता म्हणजे कोलंबसाचे गर्वगीत. त्यातील प्रत्येक ओळी इतक्या सुरेख आहेत की प्रत्येक ध्येयवादी माणूस कसा वेडा असतो ह्याचे सुंदर वर्णन कुसुमाग्रजानी ह्या कवितेत केले आहे. ह्या कवितेत कोलंबस सागराच्या मर्यादा सांगतो खरा पण माणसाची ध्येयशक्ती आणि इच्छाशक्ती इतक्या प्रबळ असतात की सागररूपी मृत्यूही त्यांच्या वाटेला जात नाही. एका ओळीत ते म्हणतात, " सहकार्यानो, जा ही खंती जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम, नक्षत्रापरी असीम निलामध्ये संचारावे, दिशांचे आम्हाला धाम!". ह्या कवितेचा शेवट करताना ते म्हणतात " अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तूझ्या पामराला! ". किती सुंदर ओळी आहेत या. ह्याचा काव्य संग्रहातील त्यांची आगगाडी आणि जमीन ह्या कवितेत हुकूमशाही, भांडवलशाही आपल्या समाजाचे कसे रक्तशोषण करीत आहे ह्याचे सुंदर वर्णन केले आहे तर पाचोळ्या कवितेत उपेक्षितांचे आणि दलितांचे भेदक जगणे जगास दाखवून दिले आहे. हाच कवी वेडात मराठे वीर दौडले सात! असे म्हणत पिचलेल्या मनगटात अनेक हत्तीचे बळ देतो तर स्वप्नाची समाप्ती करताना कवी म्हणतात " काढ सखे, गळ्यातली तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत " असे म्हणतो आणि गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार ही कविता देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांसाठी प्रेरणा देऊन जातो.

विशाखा काव्य संग्रहाप्रमाणे त्यांचे अनेक काव्यसंग्रह सुंदर आहेत. हिमरेषा ह्या कविता संग्रहात एका कवितेत कुसुमाग्रज म्हणतात, " विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिला पराजायची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत तिजला मरावयाची ". ही कविता मानवाच्या मनातल्याच भावना व्यक्त करताना दिसते. छंदोमयी  ह्या कविता संग्रहातील त्यांची प्रेमयोग ही अतिशय सुंदर कविता आपणास श्रीकृष्णच्या वेगवेगळ्या रूपाचा उपयोग करून आजच्या युगात ज्ञानयोग किंवा कर्मयोग ह्यापेक्षा प्रेमयोग महत्वाचा आहे असे सांगते. ही कविता सर्वांवार प्रेम करावयास सांगताना म्हणते," ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं, त्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं " आणि ह्याच संग्रहातील कणा ह्या कवितेतील ह्या ओळी, " पैसे नको मला सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार मोडला नाही कणा, पाठीवरती हाथ ठेवून फक्त लढ म्हणा " आपणास संकटाचा सामना करण्यासाठी बळ देतात. त्यासाठी फक्त आपल्या बाजूने उभे रहा. असे वाटते कवी ह्या कवितेत ते त्यांच्या आयुष्याचा शोध घेत आहे. ह्या संग्रहातील अजून एक कविता म्हणजे प्रेम म्हणजे. ह्या कवितेत ते प्रेमवीरांना  सांगतात, "प्रेम कर भिल्ला सारखं, बाणावर खोचलेलं, मातीमध्ये  उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं". मुक्तायन ह्या संग्रहातील त्यांची बाबा आमटे वरील कविता तर फारच सुरेख आहे पण मला आवडते अन्यथा ही कविता कारण ती म्हणते, " तत्वज्ञान त्याचे विवेचन करील, पण कविता त्याचा शोध लावेल ".

मराठी साहित्यात कुसुमाग्रजानी मोलाची भर घातली आहे. त्यांनी तीन कादंबऱ्या लिहिल्या असून एकोणीस नाटके लिहिली आहेत. इंग्लिश नाटककार ऑस्कर वाइल्डच्या An Ideal Husband ह्या इंग्रजी नाटकाचे मराठीत रूपांतर दूरचे दिवे असे करून 1946 रोजी आपले पहिले नाटक लिहिले. मग त्यांच्या नाट्य लिखाणाला सुरुवात झाली. त्यांच्या नाटकाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कुसुमाग्रज त्यांच्या नाटकात नेहमी एक जबरदस्त व्यक्तिमत्व  केंद्रस्थानी आणतात. त्यांच्या कौतेय ह्या नाटकात कुंती आणि कर्ण ह्या माता पुत्रामधील  भावनिक ताण महत्वाचा असल्याने तो केंद्र स्थानी आहे. तोच प्रकार दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, ययाति आणि देवयानी ह्या नाटकात पाहवयास मिळतो. त्यांनी लिहिलेलं नटसम्राट हे नाटक इतके अप्रतिम होते की अनेक वृद्ध लोकांनी आपले मृत्यूपत्र बदलले आणि तरुणांचाही वृद्धांकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून गेला. ह्या नाटकासाठी 17 सप्टेंबर 1988 रोजी त्यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

कुमाग्रज्यांची लेखणी ही उसळणाऱ्या समुद्राप्रमाणे विशाल असली तरी ती आकाशाला गवसणी घालणारी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून नेहमी अन्याय आणि विषमता यांच्याविषयी आवाज उठवला आहे आणि आपल्या नाटकात नेहमी शाश्वताचा शोध घेतला आहे. सुप्रसिद्ध मराठी लेखक पु. ल. देशपांडे कुसुमाग्रजावरील लेखात म्हणतात की कला निर्मिती आणि निर्माता यांच्यातील अभेद पाहायला मिळणे हा योग तसा दुर्मिळच; पण कुसुमाग्रजांच्या बाबतीत मात्र हा अभेद प्रकर्षाने जाणवतो. म्हणून कुसुमाग्रजांना मराठी साहित्यरसिकांच्या मनामध्ये एखाद्या कुलदैवताचे स्थान प्राप्त झाले आहे. पु. ल. देशपांड्यानी केलेले हे वर्णन किती सत्य आहे हे जेव्हा आपण कुसुमाग्रजांचे साहित्य वाचताना जाणवते. कुसुमाग्रजाइतकेच प्रतिभावशाली दुसरे कवी म्हणजे बा. भ. बोरकर. जेव्हा त्यांनी कुसुमाग्रजंची गर्जा जयजयकार ही कविता वाचली आणि त्या कवितेवर एक सुंदर काव्य लिहिले. ते काव्य असे आहे, "हा भागीरथीचा ओघ, दिव्य शब्दांचा, यज्ज्ञदग्ध उज्वल अश्रुंचा, रक्ताचा!. तर पाहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी लेखक वि. स. खांडेकर विशाखा ह्या काव्य संग्रहाला प्रस्तावना लिहिताना म्हणतात की रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कुणालाही समजावून सांगावे लागत नाही, डोळ्यांना ते आपोआप जाणवते. रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करीत बसत नाही. वाऱ्याच्या झुलकेबरोबर तो आला की मन क्षणार्धात प्रसन्न होऊन जाते. तसेच कुसुमाग्रजांच्या सुंदर आणि सजीव कवितेचे आहे.

सुप्रसिद्ध पत्रकार आणि लोकसत्तेचे माजी संपादक माधव गडकरी म्हणतात कुसुमाग्रजांचे सारे साहित्य शाश्वताच्या दिशेने झेपवणारी यात्रा आहे. हे पूर्णपणे सत्य आहे  कारण कुसुमाग्रज आणि त्यांचे साहित्य यांना मराठी माणसांच्या भावजीवनात निरपवाद आणि अढळ असे ध्रुवस्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्यात आणि वाचकांमध्ये एक वेगळ्या भावनेचे नाते जमले आहे त्यामुळे त्यांनी आमची जीवने समृद्ध केली. असे होण्याचे कारण म्हणजे त्यांचा माणसाच्या चांगुलपणावर, त्याच्या इच्छाशक्तीवर आणि जीवनाच्या मांगल्यावर असलेला त्यांचा विश्वास.म्हणूनच त्यांच्या पृथ्वीचे प्रेमगीत ह्या कवितेतील शेवटचे कडवे लिहून त्यांच्या बद्दल आदर व्यक्तकरून हा लेख संपवतो.

"अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन
मला ज्ञात मी एक धुलीकण
अलंकारण्याला परी पाय तुझे,
धुळीचे आहे मला भूषण!"

कुसुमाग्रज नेहमीच आमच्या आठवणीत राहणार ह्यात अजिबात शंका नाही.

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...