*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक :119*
*विषय क्रमांक :5*
*विषय : मृत्यू
एक सुंदर शेवट (वैचारिक)📝*
*दिनांक :27/01/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई*
'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे'. जो माणूस मृत्यू पावला आहे म्हणून दुसरा मानव त्याचा शोक करीत आहे, पण तो सुद्धा त्याच मार्गाने जात आहे. असे सांगत समर्थ रामदासानी मरणाचे एक सुंदर तत्वज्ञान जगापुढे ठेवले आहे. ते सांगतात की पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक जीव कधी ना कधी ह्या जगाचा निरोप घेणारच आहे. मरण ईश्वरालाही टाळता आले नाही. मग ते श्रीराम असो किंवा श्रीकृष्ण. जगताना आलेल्या सर्व सुखदुःखाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून ते मरणाला सामोरे गेले आहेत. त्यामुळे मरण हे अटळ आहे हे प्रत्येक मानवला मान्य आहे. तरीसुद्धा मानव मरणाला भीत असतो. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूमुळे तो नेहमी दुःखी होतो. हा एक नैसर्गिक मानवी गुण आहे. ही भावना त्याच्या हृदयात खोलवर रुजलेली असते. त्यामुळे तो आपल्या प्रियजनांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करतो.
काही जणांचा असा समज आहे की मृत्यू ही आयुष्याची समाप्ती नसून प्रारंभ आहे. भगवान श्रीकृष्णणांनी मरणाची सत्यता भगवतगीतेत छानपणे सांगितली आहे. ते म्हणतात की मानावाचा आत्मा अमर असतो. तो कधीही मरत नाही. माणूस जसा जन्माचा आनंद व्यक्त करतो तसाच त्याने मरणाचाही उत्सव साजरा करावा. त्यामुळे आत्म्यास मुक्ती मिळते. त्यासाठी मानवाने नेहमी मृत्यूचे स्वागत करावे. तसे केल्यास कोणताही त्रास होणार नाही. ते सांगतात की मृत्यू म्हणजे मानवी जीवनाची अखेर आहे, हे सत्य अतिशय क्षणभुंगूर असते. कारण मानव जुने वस्त्र फेकून नवे वस्त्र परिधान करीत असतो.
जीवन अनिश्चित असले तरी मृत्यू अटळ आहे. त्याबद्दल सांगताना महात्मा गांधी म्हणतात की मृत्यू हा आपला खरा मित्र आहे. मी ह्या जगात आलो म्हणूनच मी नेहमी मृत्युच्या सावलीत चालत असतो आणि वेळ येईल तेव्हा मी एकटाच निघून जाईल. मृत्यू हा आपला खरा मित्र असून तो आपल्याला क्लेशातून मुक्त करीत असतो. जो मृत्यूला घाबरतो, तो जगण्याचा आनंद कधीच घेऊ शकत नाही. कारण जन्म आणि मृत्यू ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक रात्री, जेव्हा मी झोपायला जातो तेव्हा मी मरत असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझा पुनर्जन्म झालेला असतो.
आजच्या एकविसाव्या शतकामध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवाने असामान्य प्रगती केली आहे. तरीही त्याला मृत्यूवर विजय मिळवता आलेला नाही. ज्याप्रमाणे प्राचीन काळी मानव मृत्यूला घाबरत होता, त्याचप्रमाणे तो आजच्या प्रगत काळात सुद्धा मृत्यूला घाबरत असतो. मृत्यूचे भय आणि मृत्यूची चिंता ह्या दोन भिन्न प्रवृत्ती आहेत. मृत्यूचे भय माणसाला जीवनात धैर्याने पुढे जायला शिकवते तर मृत्यूची चिंता करणारे लोक त्यास शरण जातात आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तरीसुद्धा मृत्यूची व्याख्या कोणत्याही देशाने व्यवस्थितपणे दिलेली नाही हे एक सत्य आहे. एकच व्याख्या डॉक्टर विल्यम पॉप ह्यांनी नीटपणे केलेली आढळते. ते म्हणतात की मृत्यू झाल्यावर डोळे स्थिर होतात आणि ते प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत. हृदयाचा ठोका आणि श्वास थांबतो. तोंड उघडे राहते आणि त्वचा थंड होऊन शरीराची हालचाल पूर्णपणे थांबते.
जन्म आणि मृत्यू हे दोन किनारे आहेत. जीवन
जगणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यूच्या स्वाधीन होणार. त्यावर
समर्थ रामदास आपल्या दासबोधतील एका अध्यायात म्हणतात, " माती सांगे कुंभारला, पायी
मज तुडविसी | तुझाच
आहे शेवट वेड्या, माझ्या
पायाशी | ह्या
लेखाच्या शेवटी सुप्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग ह्यांच्या Death at my Doorstep पुस्तकातील मृत्यूबद्दलचा एक उतारा देत आहे. त्यात
ते म्हणतात, "We do not talk of death
lightly -it is regarded as tasteless, ill-mannered and depressing.This is the
wrong way to look upon an essential fact of life which makes no exception : it
comes to kings as well as to beggers, to the rich and poor, to saints as well
as sinners, the young and aged. You simply cannot turn a blind eye to it and
full yourself into beliving that death comes to other people but will spare
you. I am ninety years old and my tryst with destiny is drawing near. I accept
the finality of death : we do not know what happens to us after we die ". त्याचे मराठीत भाषांतर खालील प्रमाणे.
"आपण मृत्यूबद्दल हळुवारपणे कधीच बोलत नाही कारण ते बेचव, दुर्दैवी आणि निराशाचे मानले जाते. आपण आपल्या आयष्याकडे बघण्याचा तो चुकीचा दृष्टीकोन आहे. जन्म -मृत्यू ठरलेले आहेत. त्याला पर्याय नाही त्यातून राजे किंवा भिकारी, गरीब किंवा श्रीमंत, बुद्धिमान किंवा अडाणी, संत किंवा पापी, लहान किंवा मोठा कुणीच सुटलेले नाहीत. मृत्यू फक्त दुसऱ्यांवर येईल असा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःची फसगत करणे होय. मी आता 90 वर्षाचा असल्यामुळे मी मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करत आहे. आपल्या मराणानंतर आपले काय होणार हयाची मला माहिती नाही".
म्हणून नेहमी जगताना मराणाचं स्मरण केल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण होईल.
Comments
Post a Comment