Skip to main content

Lekhaniche Dhey- गुणवत्ता कि प्रमाण

 *रंग लेखणीचे परिवार*

*आठवडा क्रमांक :116*
*विषय : लेखानाचे ध्येय : गुणवत्ता कि प्रमाण 📝*
*दिनांक :08/01/2021*
* शब्दांकन : योगेश गोगवेकर*

कोणतेही लिखाण हे लेखकाची नवी निर्मिती असते. चांगले लिखाण वाचकाचे लक्ष्य सहजपणे वेधून घेत  वाचन मनोरंजक आणि आनंदायक करून त्यास अर्थ प्राप्त करून देते. लेखन म्हणजे लेखकाचे विचार व्यक्त करण्याची क्रिया. त्यामध्ये लेखकाने केलेल्या सखोल चिंतानाचे प्रतिबिंब पडलेले असते.त्यामुळे लेखन हे प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर आधारित असेल तर ते वाचकास एका नव्या निर्मितीचा आनंद देतं.

लेखक आपले लिखाण  वेगवेगळ्या रूपात ठेवत असतो. कधी तो कविता लिहितो तर कधी कथा, कधी तो कादंबरी लिहितो तर कधी साहित्यावरची समीक्षा, कधी सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय घडामोडीवर भाष्य करतो तर कधी इतिहासावर विवेचन. हे सर्व करत असताना लेखकांस स्वतःचे आत्मचिंतन करून ज्ञान प्राप्त करणे जरुरीचे आहे. मग ते शब्दामध्ये उतरवताना प्रत्येक शब्दांचे भान व्यवस्थितपणे हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी अवांतर वाचनाची खूप आवश्यकता आहे. कारण वाचनामुळे तुलनात्मक मुद्ये व्यवस्थितपणे लिहिता येतात. जर लिखाण एखाद्या इतिहासाचा संदर्भ घेऊन करणार असेल तर त्या संदर्भाची सत्यता गुणवतेच्या आधारे पडताळणे फार आवश्यक आहे आणि त्यातील कोणताही मुद्या लांबलचक पद्धतीने न मांडता सोप्या आणि ओघावती भाषेत मांडणे जरुरीचे आहे.

लेखानातून व्यक्त होणारा अनुभव स्वयंपूर्ण, उत्कट व  सलग असतो असे सांगून सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक नरहर कुरुंदकर म्हणतात की खरा प्रतिभावंत लेखक आपल्या लेखानात  बोध आणि रंजन दोन्हीच्याही चौकटी ओलांडून मुक्त झालेला दिसतो. त्यासाठी ते शरतचंद्र  सारख्या जीवनवादी लेखकाचे उदाहरण देऊन त्यांच्या लेखानाचे मोठेपण बोधवादी आणि रंजनवादी दोघांनाही कसे मान्य आहे, हे उदाहरण देऊन स्पष्ट करतात. पुढे कुरुंदकर  म्हणतात की कुठल्याही लेखानामध्ये खरे महत्व लेखकाच्या भूमिकेला नसून,  खरे महत्व लेखनकृतीच्या स्वरूपाला व तिच्यातील अनुभवाच्या स्वरूपाला आहे. त्यामुळे प्रत्येक  लेखकाला जीवनाचे आकलन व अवलोकन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. हे सर्व गुणवत्तेच्या आधारे केल्यास एक चांगली निर्मिती झाल्याचे समाधान वाचकास मिळेल.

गुणवत्ता प्रमाण मानून लेखन करणारी लेखिका म्हणजे इरावती कर्वे. त्यांनी बरेच लिखाण केले आहे. पण त्यांनी महाभारतावर लिहिलेले युगान्त हे पुस्तक मला खूप आवडते. ते वाचत असताना एक वाचक म्हणून एक गोष्ट जास्त जाणवते ती  म्हणजे महाभारतावर त्यांनी केलेला अभ्यास. युगान्त वाचताना त्यांनी लिहिलेले  महाभारतातील प्रत्येक व्यक्तिमत्ववरील लिखाण हे खूप मौलिक आणि महत्वाचे असल्याचे जाणवते. त्यातील भीष्म आणि कृष्णावरील लेख छान तर आहेच पण गांधारी आणि द्रौपदी वरील लेख आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास भाग पाडतात. कर्णा वरील त्यांचा लेख कर्णाकडे वेगळ्या प्रकारे पाहण्याचा दृष्टीकोन देतो. त्यांचे हे लेखन अनेकांना आवडेल की नाही हे माहित नाही पण त्यांनी केलेले महाभारताचे आकलन  इतके छान आहे की त्यातील प्रत्येक पात्राचा शोध आपण वर्तमानकाळाच्या पद्धतीने घेत असतो.

गुणवत्तेच्या आधारावर वाचण्यात आलेली अजून एक निर्मिती म्हणजे रणजित देसाई ह्यांनी लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी श्रीमान योगी. ह्यात ऐतिहासिक सत्य सांगताना देसाईने कल्पनेचा वापर खूपच सुंदर पद्धतीने केला आहे. ही कादंबरी त्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिली आहे आणि महाराजांचे व्यक्तीमत्व प्रत्येक लेखकला आव्हान असते. रणजित देसाईने ते आव्हान स्वीकारून एक सुंदर कलाकृती कादंबरीच्या रूपाने सत्य घटना सांगत ठेवली आहे.ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना नरहर कुरुंदकर लिहितात, " सामाजिक कादंबरीसमोर आकलन -अवलोकन यांसाठी सामाजिक वास्तव असते, ऐतिहासिक कादंबरीसमोर ऐतिहासिक वास्तव्य असते. ह्या वास्तवाचा स्वीकार करून निर्मितीच्या आकाशात पंख पसरून झेप घ्यावयाची असते. या प्रतिक्रियेत एकीकडे कलेच्या पातळीवर सत्य साकार होत असते, नवनिर्मिती होत असते व दुसरीकडे कलाकृती जन्म घेत असते ".

अजून एका पुस्तकाचा उल्लेख इथे करावसा वाटतो ते म्हणजे तिमिरी एन मुरारी ह्यानी लिहिलेले तालिबान  क्रिकेट क्लब. ह्यात लेखाकाने तालिबान सरकारच्या काळात अफगाणिस्तानातील महिलांचे जीवन कसे तणावग्रस्त होते हे सांगताना महिलांच्या भीतीदायक जीवनाचे वास्तवादी चित्र उभे केले आहे. ह्यात लेखाकाने तालिबान सरकारच्या कारकिर्दीत घडलेल्या घडामोदींचा व्यवस्थित अभ्यास केल्याचे जाणवते.

गुणवत्तेचा आधार घेऊन अनेक लेखकांनी आपल्या लिखाणाची निर्मिती केली आहे. मग ती निर्मिती मराठीत असो किंवा इंग्रजीत. ती कलाकृती वाचताना वाचक म्हणून मिळालेला आनंद खूप वेगळा असतो. त्यासाठी अनेक पुस्तकांची नावे सांगता येतील. त्यात कादंबरी, कथा, ऐतिहासिक विश्लेषण वगैरे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे लेखकांनी प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर अधिक लक्ष द्यावे कारण गुणवत्ताच आपल्याला चांगल्या प्रकारचे लिखाण देऊ शकते मग ते लिखाण जास्त केल काय किंवा थोड केले काय त्यामुळे काही फरक पडत नाही,  फक्त लिखाणाचा विषय स्पष्ट झाला पाहिजे. त्यामुळे वाचकांच्या विचारांना स्पष्टता लाभते आणि ज्ञानाचा किंवा माहितीचा प्रसार होण्यास मदत होऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...