*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक :115
*दिनांक : 01/01/2021*
*विषय : जावे त्यांचा वंशा (वैचारिक)*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे ||
कासवाची पिल्ले दुध कैसे पीती |
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे ||
पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा |
जावे तयाच्या वंशा तेव्हा कळे ||
तुका म्हणे संत कैसे वळखावे |
आपण संत व्हावे तेव्हा कळे ||
वरील अभंग आहे तुकाराम महाराजांचा. किती सुंदर तत्वज्ञान त्यात सांगितले आहे. आजच्या जीवनाशी किती तंतोतंत जुळत आहे. माणूस आपली प्रत्येक कामे आपल्या कुवती नुसार करत असतो. तरीही तो कधीच समाधानी होत नाही. तो स्वतःच्या आयुष्याची तुलना नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्याशी करत राहतो. त्याला स्वतःपेक्षा दुसऱ्यांचे आयुष्य नेहमी सुखी किंवा आनंदी वाटत असते. मग तो आपल्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी असो किंवा एकदा उच्च पदावरील काम करणारी शासकीय व्यक्ती असो किंवा व्यापारी वर्गातील माणसे असोत किंवा डॉक्टर असोत. प्रत्येकाला दुसऱ्याचे काम नेहमी सोपे वाटते. त्यांचा नेहमीचा रुबाब पाहून आम्हाला असे वाटू लागते की किती मस्त ह्यांचं आयुष्य. पण सत्य काय असते, ह्याचाही विचार आम्हाला केला पाहिजे. वरिष्ठ पदावर पोचण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी, व्यापारात यश मिळण्यासाठी रात्रंदिवस त्यांनी घेतलेली मेहनत त्याचप्रमाणे नवीन जवाबदारी स्वीकारून घेतलेले निर्णय, त्यामगील मानसिक त्रास अशा अनेक गोष्टींचा विचार केला तर ती माणसे आपल्याला खूप मोठी वाटू लागतात. त्यासाठी आपणच स्वतःला त्यांच्या जागी बसवून विचार केला पाहिजे.
हे आठवण्याचे कारण असे की हल्लीच माझी भेट माझ्या एका मित्राशी म्हणजे दिलीपशी झाली. आज तो एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये चांगल्या हुद्यावर काम करत आहे. चार्टर्ड अकाउंटंट करून त्याने एमबीए ही केले होते. चांगला पगार आणि सर्व सुख असूनही तो सुखी नव्हता. त्याला कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नव्हता. रोजच्या मिटींग्स, बऱ्याच वेळा टूरिंगसाठी बाहेर गावी जाणे, दहा बारा तास काम करणे, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा आणि मानसिक तणावाखाली जबाबदाऱ्या पार पाडणे ह्या गोष्टी नित्याच्या झाल्या होत्या. सुट्टीचे दिवस फक्त झोपून काढणे एवढाच त्याचा कार्यक्रम होता. सर्वाना म्हणजे त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना वाटत होत की तो खुप सुखी आहे आणि आनंदी आहे. पण सत्य वेगळं होत. जेव्हा तो मला हे सांगत होता तेव्हा मला जाणवलं की सुख ह्या शब्दात एवढं समाधान एकटवलं आहे की त्याची व्याख्या करणे फार कठीण आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे तेव्हा त्या अभंगाचा अर्थ कळू लागतो.
असाच एक अनुभव माझ्या मैत्रीणेने सांगितलेला. ती एका मोठया टीव्ही चॅनलमध्ये बातमीदार म्हणून काम करीत होती. प्रत्येक बातमी मिळविण्यासाठी तिला रात्रंदिवस काम करावे लागत होते. एक दिवस तिला कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम कव्हर करण्यात सांगण्यात आले. हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी जेव्हा ती स्टुडिओ मध्ये गेली, तेव्हा तिला प्रत्येक व्यक्ती विशेष करून अमिताभ बच्चन घेत असलेली मेहनत पाहून थक्क व्हायला झाले. कार्यक्रम पूर्णपणे समजून घेऊन त्याचे सुंदर पद्धतीने सादरीकरण करणे, प्रत्येक प्रश्न हिंदी आणि इंग्रजी भाषेतून विचारताना आपली वेगळी शैली निर्माण करणे आणि मध्येच स्वतःचा हजरजबाबीपणा वापरून कार्यक्रम अप्रतिम करणे ह्या सर्व गोष्टी पाहून ती चकित झाली. तेव्हा तिला समजले की कोणतीही मोठी व्यक्ती ही खूप मेहनत घेऊन मोठी झाली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात बरेच चढ उतार पाहिलेले असतात. हे सर्व समजून घेण्यासाठी आपणास म्हणावे लागेल जावे त्यांच्या वंशा.
असाच एक चुकीचा समज डॉक्टर बद्दल. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की डॉक्टर पेशंटना तपासून झाल्यावर कागदावर औषधे लिहून देतात आणि भरपूर पैसे कमवतात. पण त्यांनी डॉक्टर होण्यासाठी घेतलेली मेहनत, केलेला अभ्यास ह्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असतो. रात्रदिवस काम करून रोगाचे अचूक निदान करण्याची त्यांची पद्धत आपल्याला खूप काही शिकवून जाते. तसेच पोलीस कर्मचारी, सीमेवर गस्त घालणारे सैनिक, शेतात राबणारे शेतकरी, साफसफाई करणारे कर्मचारी, शिक्षक, नाटक किंवा चित्रपटात काम करणारे कलावंत ही सर्वजण सचोटीने काम करीत असतात. त्या सर्वांचे सुखदुःख त्यांचे काम समजून घेतल्याशिवाय समजणार नाही. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे संत कैसे वळखावे, आपण संत व्हावे तेव्हा कळे.
म्हणूनच एखाद्या व्यक्तीबद्दल आपली मते ठरविण्या अगोदर ती व्यक्ती पूर्णपणे जाणून घेणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपल्याला सुखाची खरी व्याख्या समजेल. मग सुख तुम्हाला ध्येयवादी माणसात दिसेल, समाजाची सेवा करून माणुसकीचा धर्म जपण्याऱ्या मानवामध्ये दिसेल. ह्यातूनच आपल्याला नवीन शिकता येईल आणि गैरसमज दूर होऊन एकमेकांबद्दल आदर वाढेल. त्यासाठी जावे त्यांच्या वंशा ही म्हण योग्य आहे.
Comments
Post a Comment