Skip to main content

Drustikon Vaicharik Lekh ; दृष्टीकोन (वैचारिक)

 *रंग लेखणीचे परिवार*

*आठवडा क्रमांक : 118*

*विषय क्रमांक :2*

*विषय : दृष्टीकोन (वैचारिक)📝*

*दिनांक : 20/01/2021*

*शब्दांकन : योगेश गोगवेकर*

 माणसाला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. आपल्या वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांचा वापर करून तो आपले काम विचारपूर्वक मार्गाने पूर्ण करीत असतो. त्यासाठी त्याला एक दृष्टीकोन असावा लागतो. मग तो दृष्टीकोन सकारात्मक असो किंवा नकारात्मक. वास्तविक दृष्टीकोन हि संकल्पना गोंधळात टाकणारी आहे. सुप्रसिद्ध चित्रकार Phil Metzger हे आपल्या Art of Perpective ह्या पुस्तकात दृष्टीकोनाबद्दल म्हणतात की दृष्टीकोन दुसरे तिसरे काही नसून आपण जे पाहतो त्याची नक्कल असते--जसे एखादा दूरचा पर्वत आपणास निळा दिसतो किंवा एखादा रस्ता काही अंतरावर अरुंद दिसतो. आणि सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्ल नाइटिंगेल ह्यांनी दृष्टीकोनाबद्दल सांगताना म्हटले आहे की इतरांबद्दलचा आपला दृष्टीकोन आपल्या बद्दलचा दृष्टिकोन निश्चित करतो (Our attitude towards others determines their attitude towards us). ह्याचाच अर्थ असा आहे की दृष्टीकोन म्हणजे माणूस आपल्या भोवती असलेल्या समाजाव्यवस्थेकडे कसा पाहतो आणि त्यानुसार कसे निष्कर्ष काढतो असा आहे.

 दृष्टीकोन हा नेहमी सकारात्मक तर असलाच पाहिजे, पण तो वैज्ञानिक सुद्धा असला पाहिजे. सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे फक्त चांगला विचार करून आनंदी राहणे असा नसून वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीशी योग्यप्रकारे जुळवून घेताना आपल्या मन:स्थितीवर नियंत्रण ठेवणे असा आहे. आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा कौशल्याचा वापर करून आपल्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत किंवा प्रसंगात किंवा व्यक्तिमत्वात जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी दिसल्या पाहिजेत. त्यासाठी जगात असलेल्या चांगुलपणावर आपला विश्वास असायला हवा. सकारात्मक दृष्टीकोन आपणास कोणत्याही प्रश्नाकडे नीटपणे विचार करण्याची क्षमता देत असतो.

वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कार्यकारणभाव. वैज्ञानिक दृष्टीकोन हा नुसता विज्ञान शाखेशी संबंधित नसून समाजातल्या सर्व बाबीकडे विज्ञानाची पद्धत वापरून तर्कशुद्ध पद्धतीने बघणे असा आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनाची व्याख्या करताना नरेंद्र दाभोलकर एकदा म्हणाले होते की जेवढा पुरावा, तेवढा विश्वास! ते पुढे म्हणतात की प्रत्येक कार्याच्या मागे एक कारण असते, ते माझ्या बुद्धीला समजू शकत. जगातल्या सगळ्या कामा मागची कारणे समजतीलच असे नाही, पण ती उपलब्ध असलेल्या पुराव्यामुळे लगेच समजतील. हाच ज्ञान मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.त्यासाठी आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असलेल्या व्यक्तींचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकणे. ते ऐकल्यावर आपल्या दृष्टकोनात बदल करावासा वाटला तर तो जरूर करावा कारण कुठल्याही समस्याचे उत्तर अधिक योग्यप्रकारे शोधण्यास मदत होते. म्हणूनच अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात की कोणत्याही समस्याचे निराकरण एकाच पातळीवरून होऊ शकत नाही.

 ऐतिहासिक दृष्टीकोन म्हणजे भूतकाळात घडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक आणि भावनिक घटनांचा अर्थ समजावून घेणे असा आहे. त्यासाठी गरज असलेले पुरावे उपलब्ध करून त्यांचा खरा अर्थ वर्तमानकाळातील माणसानंपर्यंत व्यवस्थितपणे पोहचवून त्यांचा दृष्टीकोन सक्षम करणे जरुरीचे आहे. कोणताही इतिहासकार ऐतिहासिक दृष्टीकोन त्यावेळी घडलेल्या घटनांचा सामाजिक सिद्धांताद्वारे  सिद्ध करीत असतात. त्यासाठी ऐतिहासिक दृष्टीकोन समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासाबद्धल स्पष्ट आणि दुर्लक्षित केलेले तथ्य लक्षात घेणे जरुरीचे आहे. ते इतर शैक्षणिक विषयांपेक्षा वेगळे आहे हि गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्यासाठी आपणास राजकारण, अर्थशास्त्र, सामाजिक प्रथा, मुत्सद्दीपणा आणि सांस्कृतिक नियम ह्यांचा पूर्णपणे अभ्यास करून आपला दृष्टीकोन तयार करणे जरुरीचे आहे.

आपला दृष्टीकोन म्हणजे आपण जीवनाकडे पाहण्याचा एक मार्ग आहे. आपण जे काही ऐकत असतो ते एक मत आहे, पूर्ण सत्य नाही हे जाणून घेतले पाहिजे. जर ते मत आपणास योग्य वाटत नसेल तर ते जरूर बदलावे आणि त्यातून नवीन दृष्टीकोन निर्माण करावा. संपूर्ण जगामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वैचारिक विचारांची मोठी परंपरा आहे. स्वामी विवेकानंद तर म्हणत असत की जे आपल्या विवेकाला पटत असेल तरच स्वीकारा.भारताचे पहिले प्रतंप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया, कृती करण्याची पद्धत, सत्याचा शोध घेत जगण्याची पद्धत आणि मुक्त मानवाची मनोवृत्ती. त्यासाठी आपला दृष्टीकोन नेहमी सकारात्मक आणि वैज्ञानिक असावा हिच प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...