*On the meaning of life : जीवनाचा अर्थ, विल डुरंट ह्यांचे पिढ्यानं पिढ्या उपयुक्त ठरणारे पुस्तकं*
अस्वस्थ वातावरणात काही पुस्तकं हळुवारपणे मनाला फुंकर घालून नवीन जीवन जगण्याची ऊर्जा निर्माण करीत असतात. मग ती पुस्तकं कुठल्याही भाषेत असो. असेच एक इंग्रजी पुस्तक अलीकडे माझ्या वाचनात आले. त्या पुस्तकाचे नाव आहे On the meaning of life. त्यात जीवनाचा अर्थ सांगण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न विल डुरंट ह्या लेखकाने केला आहे. हे पुस्तक 1932 रोजी प्रकाशित झाले पण ते आजच्याही पिढीला उपयुक्त होईल असेच आहे.
विल डुरंट एक तत्वज्ञानी आणि इतिहासकार होते. 1930 वर्षाच्या अखेरीस एक चांगले कपडे घातलेला अनोळखी माणूस विल डुरंट ह्यांच्या न्यूयॉर्क येथील घरासमोर आला आणि त्याने डुरंट ह्यांच्याजवळ जीवन जगण्याचा अर्थ काय असा प्रश्न केला. जीवन जगण्यासाठी काही तात्विक कारणे आहेत का अशी विचारणी केली. जर ती तात्विक कारणे मिळाली नाही तर तो आपले आयुष्य संपवून टाकणार असे त्याने डुरंट यांना सांगितले. डुरंट ह्यांनी अनेक कारणे देऊन त्याला आत्महत्येपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मनुष्य तेथून निघून गेला आणि परत तो त्यांना कधीही दिसला नाही. एका अनोळखी माणसाला आत्महत्येच्या विचारापासून दूर करणे आणि त्याला जीवनाचे महत्व समजून सांगणे हे डुरंट ह्यांना कठीण जात होते.
पण हि कोंडी होती. त्यातून अनेक महत्वाचे प्रश्न निर्माण झाले. जीवनाचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे आनंद. तरीपण त्याचा योग्य अर्थ शोधण्यासाठी अनेक शिक्षण तज्ञांनी आणि विद्वानांनी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी देव आहे का? जर असेल तर आपण इतका त्रास का सहन करतो आहोत? असे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे डुरंट ह्यांनी अनेक विचारवंतांना आव्हान करून तात्विक आणि काव्यात्मक पद्धतीने पत्र लिहिले आणि त्यात जीवनाचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. त्यांनी हे पत्र कलाकार, लेखक, शास्त्रज्ञ, शिक्षक, राजकीय आणि धार्मिक नेते, खेळाडू, तत्वज्ञानी आणि कैद्यांना सुद्धा पाठवले. त्यात डुरंट ह्यांनी त्यांना लिहिले की तुमच्यासाठी आयुष्याचा काय अर्थ आहे. ते तुम्ही कसे जगत आहात आणि तुम्हाला आयुष्याची कशी मदत होते. हे मला सांगण्यासाठी क्षणभर थांबा आणि तुमचे प्रेरणास्थान काय आहे, तुमचे ध्येय काय आहे. तुम्ही करीत असलेल्या कामाचा तुम्हाला कसा आनंद मिळतो आणि आपण त्यात समाधानी आहात का. ह्या बद्धल मला नीटपणे समजावून सांगा.
डुरंट ह्यांनी हे पत्र जवळ जवळ 100 व्यक्तिमत्वना लिहिले. त्यात बहुतेक जणांनी जीवनाला सकारात्मक पद्धतीने आनंदायक कसे बनविले ह्याचे विश्लेषण करून पाठवले. त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लेखक एच एल मेणकेन आणि सिंक्लेर लेविस, कादंबरिकार जॉन एरस्किन, इतिहासकार चार्ल्स बीर्ड, नाटककार George Bernard Shaw, टेनिस खेळाडू हेलेन विल्स, तत्वज्ञानी बेर्टॅन्ड रसेल आणि न्यूयॉर्क जेल मधील कैदी नंबर 79206 ओवेन मिडलेटन आणि अजून काही व्यक्तिमत्वाचा उल्लेख आहे.
ह्यातील बऱ्याच जणांनी त्यांना उत्तरे पाठवली आणि जीवनाचा आनंद कसा घेतला ह्याबद्दल लिहिले. हि सर्व पत्रांची उत्तरे त्यांच्या श्रेणीनुसार वर्गीकृत केली आहे आणि वाचकांना रस वाटेल अशा पद्धतीने पुस्तकात समावेश केला आहे. काहींनी त्यांच्या कार्याला महत्व दिले होते आणि काम करताना कसा आनंद घेतला असे सांगितले.
ह्या पुस्तकाच्या शेवटी विल डुरंट ह्यांनी असा निष्कर्ष काढला की ज्यांना जाणीवपूर्वक जगण्याची इच्छा आहे, ज्यांना कार्यें जाणून घेण्याची आणि सर्वोकृष्ट निर्मिती करण्याची इच्छा आहे, त्यांनी शंकास्पद वागण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अस्वस्थ वातावरणामुळे आपण निराशावादी बनले नाही पाहिजे. आपली घरे किंवा संपत्ती रिक्त झालेली नसून आपली अंतःकरण रिक्त झाले आहे. त्यासाठी मानवाच्या महानतेवर विश्वास ठेवून माणसाला आत्महत्येपासून परावृत करू शकतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतो.
हे पुस्तक खरोखर आजच्याही जगासाठी लागू आहे. ह्या पुस्तकात असे हि म्हटले आहे की ज्ञान प्राप्तीच्या सर्व गोष्टी विज्ञानात आहे आणि विज्ञान सर्वप्रकारच्या रिमेक साठी मुक्त आहे. विज्ञानाचा उपयोग सर्व मानव जातीसाठी करून मानवाला सुखी करता येऊ शकत. त्यासाठी तत्वज्ञाची मदत होऊ शकते. विद्यापीठे ह्या आमच्या महान संस्था आहेत. त्या आम्हाला नवीन कल्पना, नवीन शोध लावण्यास मदत करत आहेत. आणि आमची आशावादी दृश्ये विकसित करण्यास मदत करीत आहेत.
जीवनाचा अर्थ समजण्यासाठी आणि महान व्यक्तीचे मन जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं फार चांगले आहे. हे 1932 साली प्रकाशित झालेलं पुस्तक, 88 वर्षानंतरहि खूप वाचून आनंद मिळतो.
योगेश गोगवेकर
मुंबई
05/12/2020
Comments
Post a Comment