*वाचनच ज्ञान मिळवण्याची खाण*
मित्रानो, जेव्हा मी एखादे पुस्तकं वाचायला घेतो तेव्हा नकळत मी अंधाराला दूर करून प्रकाशाची दारे उघडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी विकत घेतलेली पुस्तके किंवा ग्रंथालयातून आणलेली पुस्तके वाचुन त्यांची विश्लेषण करणे हा एक मेहनतीचा भाग आहे. नुसतं पुस्तकं वाचून बाजूला ठेवणं हा प्रकार नसतो. त्यातून माहीत झालेली माहिती लिखित स्वरूपात इतरांना सांगणे हा सुद्धा एक भाग असतो. त्यासाठी स्वतःला पूर्णपणे माहीत करून घेणे जरुरीचे असतें.
जगातील अनेक महान व्यक्तींनी जी बौद्धिक उंची गाठली आहे त्याचे कारण म्हणजे वाचन. वाचनाने ज्ञानाचे कालवे बंधमुक्त होतात. तुम्हाला माहीत नसलेली अनेक गुपिते तुम्हाला समजतात.वाचनच खरी अलिबाबाच्या गुहेची किल्ली आहे. तुम्हाला मानवी जीवनाचे तात्पर्य शोधायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही.चार्लस किंग्जले हा सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणतो "जिवंत माणूस सोडल्यास भूतलावर पुस्तकासारखी अन्य विलक्षण गोष्ट नाही. ज्या माणसाला आपण कधी पाहिले नाही. जो आपल्या पासून दूर राहतो. तो ह्या छोट्याश्या कागदावर जी अक्षरं लिहितो ती अक्षरं आपल्याशी बोलतात, आपल्याला शिकवतात आणि आपल हृदय उघड करतात ".
आजच्या गजबजलेल्या संभ्रमित जीवनात तुमचा एकमेव आधार म्हणजे वाचन. ताळेबंदीच्या काळात वाचनाने एकप्रकारे वेगळेच सुख दिले. त्यामुळे अनेक विचावंतांशी, व्यासंगी आणि बुद्धिमंतांशी पुस्तकातून भेट झाली. त्यामुळे मला असे वाटत की माणसाला वाचनाचा एक विरंगुळा द्या, त्याला त्याची सवय लावा, म्हणजे त्याला ज्ञान म्हणजे काय असत ह्याची जाणीव होईल. एक जुनी गोष्ट वाचताना राजा भर्तृहरीला एक सुंदर कविता ही राज्यापेक्षा मोलाची वाटते. तो म्हणतो, " सुकविता यद्दास्ती राज्येन किम !". तर कुसुमाग्रज लिहितात, तत्वज्ञान त्याचे विवेचन करील, पण कविता त्याचा शोध लावते. कारण तो आणि आपण ह्यांच्यातील संबंध नाही मीमांसेचा तो आहे फक्त काव्याचा".
ह्या लेखाचा शेवट करताना मी सुप्रसिद्ध लेखक W Somerset Maugham ह्यांच्या पुस्तके आणि तुम्ही ह्या पुस्तकातील विधान देऊन माझा हा लेख संपवत आहे. ते म्हणतात, "पुस्तकात दुसरे तिसरे काहीही नसल तरी एका चांगल्या एकाच वाक्यासाठी वाचले पाहिजे. कारण थोर ग्रंथकार तुमचे विचार घडवितात आणि तुमच्या जीवनाला वेगळा आचार देतात".
योगेश गोगवेकर
मुंबई
20/10/2020
Comments
Post a Comment