महाराष्ट्र दिनानिमित्त...
संकेतस्थळ:
१ मे १९६० हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा हे सर्व मराठी प्रांत एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या भूमीने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मराठी संस्कृती केवळ भारतभरच नव्हे, तर जगभर पोहोचवली.
महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ इतिहास नाही, तर तो पराक्रम, विचार आणि संस्कृती यांचा तेजस्वी वारसा आहे. रणांगणावरचे शौर्य असो, खेळाच्या मैदानावरील कर्तृत्व असो, किंवा संगीत, साहित्य, नाटक, सिनेमा, वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान — प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या भूमीने संतांचा वारसा दिला, विचारवंत घडवले आणि समाजाला दिशा दिली. म्हणूनच गोविंदाग्रज आपल्या महाराष्ट्र गीतात म्हणतात,
"देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ
तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ
जिथे रंगली साधीभोळी जनाईची गाणी
तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी."
हा आपला गौरवशाली भूतकाळ आहे: पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा—आज आपण त्या वारशाला कितपत न्याय देत आहोत?
आजच्या काळात प्रेरणा कमी होत चालल्याचे दिसते. ध्येयवाद, त्याग, लोकसेवा आणि मोठी स्वप्ने पाहण्याची वृत्ती कमी होत आहे. प्रत्येक जण स्वतःच्या फायद्याचा विचार करत आहे आणि त्यासाठी कुठलीही किंमत मोजण्याची तयारी दिसते.
खेळ, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही आपण मागे पडत आहोत. मराठीत दर्जेदार साहित्यनिर्मिती कमी होत चालली आहे. आपण इंग्रजी शिकतो, पण त्यातही प्रावीण्य मिळवत नाही, आणि मराठीही नीट वापरत नाही. त्यामुळे आपली भाषा आणि संस्कृती दोन्ही धोक्यात येत आहेत.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे साहित्य, संगीत आणि कला नसलेला माणूस हा केवळ यांत्रिक बनतो. त्याच्याकडून महान कार्य घडू शकत नाही.
अशा वेळी कवी अनिल यांच्या ओळी आपल्याला विचार करायला भाग पाडतात—
"सारेच दीप कसे मंदावले आता
ज्योती विझू-विझू झाल्या
की झाड घालून प्राण द्यावा पतंगाने
असे तेज कुठे दिसत नाही!
थिजले कसे आवाज सारे?
खडबडून करील पडसाद जागे
अशी कुणाची साद नाही?"
या ओळी आपल्या आजच्या वास्तवाचे चित्रण करतात.
म्हणूनच आज गरज आहे ती सर्वांगीण परिवर्तनाची—धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक अशा प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची.
प्रत्येक मराठी माणसाने विविध विषयांचे ज्ञान मिळवावे, त्यात प्रावीण्य मिळवावे आणि ते समाजाच्या हितासाठी वापरावे. तेव्हाच महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल आणि त्यातून भारताचीही प्रगती साधेल. कारण महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही, तर तो भारताच्या प्रगतीचा कणा आहे.
याच भावनेतून सेनापती बापट म्हणाले होते—
"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा."
चला, या महाराष्ट्र दिनानिमित्त आपण सर्वजण एक संकल्प करूया—
आपल्या संस्कृतीचा, भाषेचा आणि मूल्यांचा अभिमान बाळगूया,
आणि आपल्या कृतीतून महाराष्ट्राला अधिक समृद्ध बनवूया.
आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद,
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment