शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक: २१२
विषय क्रमांक: ४
विषय: हवहवसं वाटणारं वेंधळेपण (दीर्घ लेख)
शब्दांकन: योगेश गोगवेकर, माहीम, मुंबई
परीक्षक: डॉ. मायाताई दि. यावलकर
संकेतस्थळ:
जेव्हा आपण एखाद्या माणसाला ‘वेंधळा’ म्हणतो, तेव्हा तो आपल्याला बावळट,
गबाळा किंवा कोणतेही काम व्यवस्थित न करणारा वाटतो. परंतु या वेंधळेपणात एक
वेगळाच प्रामाणिकपणा दडलेला असतो. त्यात निरागसता, अजाणतेपणा आणि कुठेतरी
हरवलेल्या भावनांना पुन्हा सापडण्याची एक हाक असते. म्हणूनच हे वेंधळेपण
कधी कधी हवहवसं वाटू लागतं.
आजच्या काळात माणूस स्वतःला सिद्ध
करण्यासाठी सतत एका मृगजळामागे धावत असतो. त्यासाठी तो स्वतःला इतका
गुंतवून घेतो की त्याच्या आत दडलेल्या बेफिकीर वृत्तीपासून आणि निरागस,
मोकळ्या मनापासून तो दूर जाऊ लागतो. स्वतःच्या कामात तो इतका गुंतून जातो
की स्वतःच्या आनंदासाठी स्वतःमध्ये हरवून जाण्याचाही तो प्रयत्न करत नाही.
मग तो नातेवाईकांपासून, मित्रांपासून दूर होत जातो आणि त्या नात्यांमध्येही
परिपूर्णता शोधू लागतो. त्यामुळे त्याचा आनंद हरवत जातो.
या
वेंधळेपणाच्या संदर्भात मला माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवतो. हा प्रसंग
माझ्या महाविद्यालयीन काळातील आहे. एकदा सकाळी साडेनऊच्या सुमारास मी
बांद्राला जाणारी बस पकडण्यासाठी थांब्यावर उभा होतो, कारण मला साडेदहाच्या
अर्थशास्त्राच्या व्याख्यानाला उपस्थित राहायचं होतं. तेवढ्यात जवळच्या
एका हॉटेलमधून ध्वनिक्षेपकावर ‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ ही
भैरवी रागातील, दादरा तालात बांधलेली, शकील बदायूँनी यांनी लिहिलेली आणि
बेगम अख्तर यांनी गायलेली अजरामर गझल कानावर पडली. मी नकळत तिथेच थांबलो
आणि त्या सुरांत हरवून गेलो. परिणामी माझं अर्थशास्त्राचं व्याख्यान चुकलं.
हा
प्रसंग नक्कीच वेंधळेपणाचा म्हणावा लागेल. पण जर त्या दिवशी मी ती गझल
ऐकली नसती, तर मला मिळालेला तो अलौकिक आनंद कधीच अनुभवता आला नसता. त्या
क्षणाने मला संगीताच्या एका नव्या विश्वाची ओळख करून दिली. म्हणूनच मला
वाटतं की असं वेंधळेपण आयुष्यात असायलाच हवं.
आजचं जीवन स्पर्धेचं
आणि अचूकतेच्या अट्टहासाचं झालं आहे. या शर्यतीत आपण स्वतःतल्या निरागस
आनंदाला दूर लोटतो. माणूस स्वतःशी प्रामाणिक राहणं विसरतो. सकारात्मकतेची
ऊर्जा मिळत असतानाही तो अनेकदा नकारात्मक विचारांच्या भोवऱ्यात अडकतो.
त्यामुळेच आयुष्यात कधीतरी वेंधळेपण अनुभवणं गरजेचं वाटतं. पण हे वेंधळेपण
बेजबाबदारपणा नव्हे; तर स्वतःच्याच आनंदासाठी स्वतःमध्ये हरवून जाणं आहे.
मानवी
जीवन हे एक चिरंतन, न सुटणारं कोडं असलं, तरी या जगातील प्रत्येक गोष्ट
अर्थपूर्ण आहे. निसर्गसंपदेने, सौंदर्याने आणि संधींनी परिपूर्ण अशा या
विश्वातून नेमकं काय घ्यायचं, हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं असतं. म्हणूनच
माणसाने आशावादी राहणं आवश्यक आहे. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवत
प्रत्येक क्षण आनंदाने स्वीकारणं गरजेचं आहे. छंद जोपासल्याने नवीन विचार
जन्म घेतात आणि जीवन पुन्हा अर्थपूर्ण वाटू लागतं. याचाच अर्थ असा की
माणसाने प्रत्येक गोष्टीत अचूकता शोधण्याचा अट्टहास करू नये. सूर्य उगवला
की पशुपक्षी उत्साहाने दिवसाची सुरुवात करतात; मग माणसाने जीवनाचा आनंद
व्यक्त करताना थोडा वेंधळेपणा केला, तर त्यात काहीच गैर नाही.
याच
संदर्भात सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी एरिक फ्रॉम यांच्या
‘To Have or To Be?’ या पुस्तकाची आठवण येते. त्यांनी जगण्याच्या दोन
पद्धती मांडल्या आहेत. एक म्हणजे वस्तूंचा साठा करणे आणि दुसरी म्हणजे
अनुभवांच्या माध्यमातून जीवनाचा आनंद घेत राहणे. खरा आनंद हा दुसऱ्या
मार्गात आहे. इथेच वेंधळेपणाची खरी जाणीव होते—क्षणात हरवून जाण्याची.
या
जगात इतकं सौंदर्य, कला आणि सर्जनशीलता आहे की एक जन्मही अपुरा पडावा!
उस्ताद झाकीर हुसेन यांचा तबला किंवा बेगम अख्तर यांच्या गझला ऐकताना आपण
नकळत त्या सुरांत हरवून जातो. त्या क्षणी आपण कोण आहोत, काय करतोय, याचं
भान राहत नाही, हेच तर ते हवहवसं वाटणारं वेंधळेपण!
आज आपण प्रत्येक
गोष्ट मोजूनमापून करतो, परिपूर्णतेच्या मागे धावतो. पण या परिपूर्णतेच्या
अट्टहासात आनंदाची सहजता हरवते. कारण आनंद हा परिपूर्णतेत नसून अपूर्णतेत
दडलेला असतो. म्हणूनच कधीतरी नियमांच्या चौकटीतून बाहेर पडून, स्वतःसाठी
जगणं आणि त्या क्षणात हरवणं आवश्यक आहे.
जीवनातील छोट्या
अनुभवांमध्ये मोठं तत्त्वज्ञान दडलं आहे. हे अनेक विचारवंतांनी सांगितलं
आहे. हाच हवा असलेला वेंधळेपणाच आहे, असे मला वाटते.
या सगळ्या
प्रवासात वेंधळेपण एक वेगळीच भूमिका बजावतं. कारण हे वेंधळेपण आपल्याला
स्वतःकडे परत आणतं. ते आपल्याला सांगतं की कधीतरी नियम बाजूला ठेव,
स्वतःसाठी जग, स्वतःच्या आनंदात हरव. परंतु हे वेंधळेपण बेजबाबदारपणात
रूपांतरित होऊ नये. जबाबदाऱ्या सांभाळत, त्यामध्ये थोडी मोकळीक निर्माण
करून हे वेंधळेपण अनुभवायचं असतं.
मानवी जीवन हे सहा ऋतूंप्रमाणे
बहरलं पाहिजे. कधी ते उन्हाळ्यासारखं तापणारं, कधी पावसासारखं शांत होणारं,
तर कधी हिवाळ्यासारखं स्थिर असणारं हवं. या सगळ्या अनुभवांतूनच जीवन
समृद्ध होत राहणार. कवी मंगेश पडगावकर यांनी, “या जन्मावर, या जगण्यावर
शतदा प्रेम करावे.” या ओळी लिहून संपूर्ण विचारांचा सार सांगितला आहे.
शेवटी,
‘वेंधळेपण’ म्हणजे जीवनापासून पळ काढणं नाही, तर जीवनाशी पुन्हा जोडून
घेणं आहे. स्वतःला मोकळं करणं, आनंदाने जगणं आणि प्रत्येक क्षणाचा आस्वाद
घेणं आहे.
म्हणून शेवटी एवढंच म्हणेन,
‘थोडं वेंधळं व्हा, थोडं निरागस राहा,
आणि या सुंदर जीवनावर मनापासून प्रेम करा.’
धन्यवाद
योगेश गोगवेकर
%20%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%8720260427_150453.jpg)
Comments
Post a Comment