Skip to main content

पुस्तक परीक्षण:बियाँड अ बाउंड्री लेखक: सी.एल.आर.जेम्स



विषय: पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव: बियाँड अ बाउंड्री
लेखक: सी.एल.आर.जेम्स
प्रकाशक: Vintage Classics (विनतेज क्लासिक)
पाने: ३६८
किमत: रुपये ४५०
शब्दांकन : योगेश गोगवेकर

क्रिकेट हा खेळ जरी फुटबॉल किंवा टेनिस प्रमाणे प्रसिद्ध नसला तरी बऱ्याच देशात या खेळाला भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळेच या खेळावर अनेक लेखकांनी लिहिलेली भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. मी सुद्धा क्रिकेटप्रेमी असल्यामुळे माझ्या स्वतःच्या संग्रहात या खेळावर लिहिलेली अनेक पुस्तके आहेत. पण क्रिकेट वरचे एक पुस्तक बियाँड अ बाउंड्री मला नेहमीच माझ्या संग्रही असावे असे वाटत होते. याला अनेक कारणे आहेत. हे पुस्तक पहिल्यांदा १९८५ च्या सुमारास माझ्या वाचनात आले होते. त्यानंतर मी हे पुस्तक तीन ते चार वेळा तरी नक्की वाचले असेल. परत एकदा हे पुस्तक वाचण्याचा योग मला मागच्या महिन्यात आला. यावेळी सुद्धा हे पुस्तक वाचताना असे जाणवले की जो विलक्षण आनंद मला पहिल्यांदा वाचताना मिळाला होता तसाच आनंद मला यावेळी वाचताना मिळत होता. याला कारण म्हणजे हे पुस्तक अशा विचारवंत लेखकाने लिहिले आहे की ज्यांनी आपले जीवन क्रिकेट या खेळासाठी समर्पित केले होते. या खेळाचे महत्व सांगताना या पुस्तकाच्या लेखकाने क्रिकेटचे मानसशास्त्र,सौंदर्यशास्त्र सांगत या खेळाचा वर्ग वंशाचा शोध घेऊन त्यामागील राजकारणाचासुद्धा उल्लेख केला आहे. या अप्रतिम पुस्तकाचे लेखक आहेत सिरिल लिओनेल रॉबर्ट जेम्सजे क्रिकेट जगात सी.एल.आर.जेम्स म्हणून प्रसिद्ध आहेत.

सी.एल.आर.जेम्स यांचे पूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी समर्प्रित होते. हे पुस्तक क्रिकेट या खेळाचा इतिहास नसून इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मध्ये हा खेळ खेळत असताना, पाहत असताना जो सामाजिक प्रभाव लेखकावर आणि वेस्ट इंडीजमधील समाजावर पडला त्या परिणामांचा हा लेखाजोगा आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला एक गोष्ट जरूर जाणवते ती म्हणजे लेखकाला क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने समजाला होता. ते म्हणत की क्रिकेट हा जरी एक खेळ असला तरी या खेळला एक कलात्मक किनार आहे. म्हणून ते या खेळाचा कधीही त्याच्या तंत्रानुसार विचार करीत नाही. संघाची गतिशीलताकौशल्यफलंदाजगोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यातील मनोवैज्ञानिक सामना कसा झाला हे जाणून घेण्यात लेखकाला रस वाटत नाही. त्यामुळे लेखक म्हणतात की हा खेळ त्यांना जसा आवडला तसा तो खेळत त्यांनी या खेळाची सौंदर्यस्थाने समजून घेऊन खेळाचा आनंद घेतला. त्यासाठी ते आपल्या प्रस्तावनेत सुप्रसिद्ध इंग्लिश कवी रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘English Flag’ या कवितेच्या काही ओळींचा वापर करून या खेळाचे महत्व सांगतात. त्या मूळ इंग्रजी भाषेतील ओळी आहे,”What should they know of England who only England knows?” इथे थोडे बदल करून सी.एल.आर.जेम्स लिहितात,“what do they Know of Cricket who only cricket know?”

४ जानेवारी १९०१ ही सी.एल.आर.जेम्स यांची जन्मतारीख असून त्यांचा जन्म पोर्ट ऑफ स्पेनत्रिनिदाद येथे झाला. त्यांचे शिक्षण सुद्धा तिथेच झाले. त्यांनी आपल्या जीवनात आणि शिक्षणात क्रिकेट या खेळाचे महत्व पूर्णपणे ओळखले होते. त्यांनी शैक्षणिक कारकिर्दीसह क्रीडा जीवनाचा अवलंब करण्याचा पारंपारिक कौटुंबिक प्रकार नाकारला. त्यामुळे त्यांचे शिक्षण त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलच्या खेळपट्ट्यांवर झाले. विद्यापीठातील शिक्षण झाल्यानंतर सी.एल.आर.जेम्स एक वर्ष त्रिनिदाद लीगमध्ये एक वर्ष क्रिकेट खेळले. मग १९३२ साली लँकेशायर लीगमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तिथे गेल्यावर त्यांना आपली रोजी रोटी मिळविण्यासाठी मँचेस्टर गार्डियनमध्ये क्रिकेट वार्ताहर म्हणून लिहायला सुरुवात केली. त्यावेळचे सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू लीरी कॉन्स्टंटाईनला (Learie Constantine) त्यांचे Cricket and I हे आत्मचरित्र लिहिण्यास त्यांनी मदत केली. त्याचवर्षी म्हणजे १९३२ रोजी सी.एल.आर.जेम्सनी,” ‘The case for West Indian Self-Government” हे पुस्तक लिहिले आणि त्याचा प्रचंड प्रभाव कॅरिबियन राष्ट्रवादावर झाला.

बियाँड अ बाउंड्री हे पुस्तक पहिल्यांदा 1963 मध्ये प्रकाशित झाले. वर म्हटल्याप्रमाणे हे वैयक्तिक संस्मरण आणि क्रिकेटचे सामाजिक भाष्य आहे. या पुस्तकाची सुरुवात लेखकाने त्यांच्या कुटुंबाचा इतिहास आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर झालेला क्रिकेटचा प्रभाव यापासून केला आहे. जेम्स स्वतः वसाहतवादीविरोधी होते आणि कॅरिबियन राज्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आंदोलन सुद्धा केले होते. आयुष्यभर ते राज्यकर्ते म्हणून राहिले असले तरी त्यांचे क्रिकेटवरचे प्रेम कायम राहिले होते. या पुस्तकात त्यांनी सुरुवातीला आपले बालपण आणि क्रिकेट या खेळाची आवड कशी झाली यावर छानपणे लिहिले आहे. जेम्स यांची अजून एक खुबी म्हणजे ते जेव्हा क्रिकेटच्या खेळाबद्दल लिहितात तेव्हा ते कळत नकळत ते आपल्याला वेस्ट इंडिजच्या संस्कृतीची ओळख करून देतात. त्याचप्रमाणे इथे लेखक जॉर्ज जॉनविल्टन सेंट हिल आणि लीरी कॉन्स्टंटाईन सारख्या काही महान वेस्ट इंडिज क्रिकेट खेळाडूं सोबत त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल वैयक्तिक पातळीवर चर्चा करतात आणि त्या चर्चेत जगाच्या सामाजिक इतिहासात खेळाचे महत्त्व समजून सांगतात. त्या उद्देशाने ते ग्रीक मधील खेळाच्या मुळापर्यंत जाऊन ऑलिम्पिक खेळ आणि अथेनियन नाटक समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व समजवून सांगताना लेखकाने थॉमस अरनॉल्ड आणि टॉम ह्यूजेस यांनी खेळासाठी कसे योगदान दिले यावर प्रकाश टाकला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संघ आणि कर्णधारांच्या निवडीच्यावेळी कशाप्रकारे राजकारण आणि वंशवादाचा उपयोग वेस्ट इंडियन क्रिकेटमध्ये केला जातो यावर चर्चा केली आहे.

बियाँड अ बाउंड्री हे पुस्तक जगाच्या निर्मितीत क्रिकेट या खेळाने बजावलेल्या भूमिकेचे सूक्ष्म विश्लेषण आहे. या पुस्तकाबद्दल सुप्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा म्हणतात की बियाँड अ बाउंड्री हे पुस्तक एका माणसाचे आत्मचरित्र असून त्याने क्रिकेटच्या खेळासाठी आयुष्यभर दिलेल्या योगदानाचा विस्तृत सारांश आहे. ते पुढे म्हणतात की हे एक सुंदर साहित्य असून काळजीपूर्वक आणि प्रेमाने रचलेले लिखाण आहे की ज्यात अनुभवआनंदविनोदनिराशा आणि शोकांतिका सुद्धा आहे.

बियाँड अ बाउंड्री हे पुस्तक प्रत्येक कट्टर क्रिकेट प्रेमींनी जरूर वाचले पाहिजे यात कुठे हि संदेह नाही. पण मला वाटते हे पुस्तक वाचण्यासाठी कुणी क्रिकेट खेळाचे चाहते असले पाहिजेच असे नाही. हे पुस्तक लेखकाच्या संस्मरणाचा एक भाग आहे. तसेच वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासाचा मनमोहक भाग आहे जो वाचला गेला पाहिजे. सुंदर कथनासह उत्कृष्ट इंग्रजीत लिहिलेले हे खूपच सुंदर काम आहे. मी क्रिकेटवर वाचलेल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की क्रिकेट या खेळाचे मानवी जीवनात बरेच योगदान आहे.

जॉन आर्लोट हे महान  क्रिकेट समालोचक आणि या खेळावर लिखाण करणारे महत्वाचे लेखक आहेत. बियाँड अ बाउंड्री हे पुस्तक वाचून त्यांनी लिहिले की 1963 वर्ष हे क्रिकेट पुस्तकाच्या प्रकाशनाने इतके उल्लेखनीय आहे की कोणत्याही समीक्षकाला त्याचे वर्णन करण्यापूर्वी अनेक वेळा त्याचे विशेषण तपासण्यास भाग पाडते कारण समीक्षेचा व्यवहार वरवर करत असण्याची शक्यता असल्याने अतिप्रशंसा जशी टाळणे गरजेचे आहे तसेच अति काळजीपूर्वक विश्लेषण या पुस्तकाला गरजेचे नाही… बहुतेक सर्व समीक्षकांच्या मतेक्रिकेटच्या खेळावर लिहिलेले हे सर्वोत्तम पुस्तक आहे. ते पुढे म्हणतात की  हे पुस्तक दुसरे तिसरे काहीही नसून क्रिकेटर्सचे बायबल आहे.

खरोखरच हे एक उल्लेखनीय समृद्धीचे पुस्तक आहे जे क्रिकेटच्या खेळाबद्दल आपली समज वाढवते.

धन्यवाद
योगेश गोगवेकर  

Comments