Skip to main content

Dipotsav-दीपोत्सव

शुभ दीपावली
रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक :२६६
विषय क्रमांक : ३
विषय : दीपोत्सव
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम , मुंबई

दीपोत्सव हा फार प्राचीन काळापासून चालत आलेला पारंपारिक सण आहे. हा एक असा दीप मांगल्याचा सण आहे जो माणसांच्या आयुष्यातील अंधार दूर करून माणसाला प्रकाशाच्या दुनियेत घेऊन येण्यास मदत करतो. या सणाची सुरुवात आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवसांपासून होते आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी या सणाची समाप्ती होते. याचा अ र्थ हा पाच दिवसांचा उत्सव असून सर्व भारतात वेगेवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या पाचही दिवसात प्रत्येक दिवशी विशिष्ट पद्धतीचे विधी केले जातात. हे करीत असताना घरात किंवा घराबाहेर तेलाचे छोटे दिवे लावतात तर उंच ठिकाणी आकाश कंदील आणि दिव्यांची तोरणे लावली जातात. घराबाहेर रांगोळी काढून तो भाग सजवला जातो. या सणाचा पहिला दिवस धनत्रयोदशी तर दुसरा दिवस नरकचतुर्दशी म्हणून ओळखला जातो. तिसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते. चौथा दिवस बलिप्रतिपदा आणि पाचवा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून ओळखला जातो. दिव्यांचा उत्सव असलेला हा सण केव्हापासून साजरा केला जातो हे सांगणे फार कठीण आहे. वेगवेगळ्या पुराण कथेत निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील अचूक कथा कोणती आहे हे समजून घेणे खूप कठीण काम आहे. अबू रेहान अल-बिरुनी यांच्या मते, एक इराणी विद्वान आणि बहुविज्ञानी, अकराव्या शतकात भारतात आला आणि त्याने हिंदू लोकांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. त्यांच्या लिखाणातील संदर्भांच्या आधारे सहज लक्षात येईल की नऊशे वर्षांपूर्वीही हा दीपोत्सव किंवा दिवाळीचा सण ज्या पद्धतीने साजरा केला जात होता त्याच पद्धतीने हा सण आजही साजरा केला जात आहे .म्हणून या सणाच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

दीपोत्सव हा सण भारतात दीपावली किंवा दिवाळी अशा नावानेसुद्धा साजरा केला जातो. हिंदू लोकांसाठी हा सण फार पवित्र मानला जातो. हिंदू धर्माप्रमाणे जैन आणि शीख धार्मिय लोक सुद्धा हा सण पवित्र मानीत असतात . दीपोत्सव किंवा दीपावली, दिवाळी या शब्दांचा अर्थ दिव्यांची रांग असा आहे. अंधारावर प्रकाशाचा विजय असा या सणाचा अर्थ असल्यामुळे या सणाला विजयाचे प्रतिक मानले जाते. जैन धर्मा मध्ये हा सण साजरा करण्यामागे एक कथा सांगितली जाते. ती कथा असे सांगते की वर्धमान महावीर जे जैन धर्माचे शेवटचे तीर्थकर होते. त्यांनी १५ ऑक्टोबर ५२६ बीसी या दिवशी जे आत्मज्ञान प्राप्त केले तेव्हापासून त्या धर्मात दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. हिंदूंच्या पुराण कथेमध्ये हा सण कमीत कमी तीन हजार वर्षापासून साजरा केला जातो असे सांगितले आहे. प्राचीन काळातील इतिहासावर भाष्य करताना बी. के.गुप्ते दीपोत्सवाचा संदर्भ देताना म्हणतात की प्राचीन काळी शरद ऋतूमध्ये आश्वयुजी किंवा आग्रयण सारखे यज्ञ केले जात होते. त्यासाठी वेगवेगळे खाद्यप्रकार बनविले जात असत. असा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून दीपोत्सव साजरा करणे होय. यात किती सत्यता आहे हे नीटपणे सांगता येत नाही. उत्तरे कडील काही पुराण कथेत अशी गोष्ट सापडते की श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपून आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या समवेत आयोध्येस परत आले म्हणून अयोध्येतील नागरिकांनी मातीचे दिवे लावून शरयू नदीचा परिसर प्रकाशित केला. तेव्हापासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते. पण प्रत्यक्ष रामायणात प्रभू रामचंद्र आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून वैशाख महिन्यात अयोध्येला आले असे म्हटले आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याची प्रथा केव्हा पडली याचे अचूक उत्तर मिळणे कठीण होत जाते. एवढे मात्र खरे आहे की पावसाचे दिवस संपल्यानंतर शेतात समृद्धी निर्माण होते, तेव्हा त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो असे मानले जाते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लहान मुले मातीचे किल्ले किंवा मातीची खेळणी तयार करतात. ही प्रथा केव्हा आणि कधीपासून सुरु झाली याची ही नोंद कुठेही आढळत नाही. तरीसुद्धा या पाच दिवसाच्या सणाला फार महत्व आहे. ते का आहे हे पुराणकथेच्या आधारे समजून घेऊ.

दिवाळीचा पहिला दिवस असतो तो म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावा दिवस असून सोने, दागिने, कापड आणि नवीन भांडी खरेदी करण्यासाठी हा शुभ दिवस आहे असे मानले जाते. धनत्रयोदशी हा संस्कृत शब्द असून यात धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरा असा अर्थ आहे. या दिवशी हिंदू कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. या देवता संपत्ती देणाऱ्या आहेत. या दिवसाचे एक महत्त्व सांगताना म्हटले जाते की लक्ष्मी समुद्रमंथनाच्या वेळी सोन्याचे भांडे आणि संपत्ती घेऊन समुद्रातून अवतरली. त्यामुळे भगवान कुबेर सोबत लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी घरामध्ये सर्व जागा पावित्र्य करून घराची पूर्ण स्वच्छता करावी लागते. मग दिवा लावावा लागतो आणि देवी व देवाला मिठाई व फळे अर्पण करावी लागतात. धनत्रयोदशीच्या संदर्भात भारतीय पौराणिक कथांमध्ये एक मनोरंजक कथा आहे. हैम नावाचा एक राजा होता. त्याचे त्याच्या राज्यावर आणि जनतेवर प्रेम होते. त्याला एक मुलगा होता. एका ज्योतिषाने त्याच्या सोळाव्या वाढदिवसाला सर्पदंश झाल्यामुळे त्याचा मुलगा मरेल असे भाकीत केले. राजा हैमाला ही मानसिक वेदना होती आणि त्याने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. एका ज्योतिषाने त्याला सांगितले की आपल्या मुलाने भाग्यशाली कुंडली असलेल्या मुलीशी लग्न करावे. एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपल्या मुलाचे लग्न भाग्यशाली कुंडली असलेल्या मुलीशी केले. या जोडप्याने काही दिवस त्यांच्या आयुष्याचा आनंद लुटला. मुलगा सोळाव्या वर्षाचा होऊ लागला आणि राजाला त्याच्या मुलाची काळजी वाटू लागली. मुलाच्या सोळाव्या पूर्वसंध्येला, त्याच्या पत्नीने आपल्या पतीचा जीव वाचवण्याची योजना अत्यंत हुशारीने केली. तिने आपले सर्व दागिने गोळा केले आणि मुख्य दरवाजासमोर ढीग केला आणि पतीला रात्रभर झोपू नये म्हणून सांगितले. तीही रात्रभर जागून घराच्या दारात बसून पहारा देऊ लागली. मृत्यूचे देवता भगवान यम घरासमोर नागाच्या रूपात आले. घराच्या मुख्य दरवाजापर्यंत साप रेंगाळला पण दागिन्यांच्या ढिगाऱ्याने त्याचा रस्ता अडवला. त्यामुळे त्याला आजूबाजूला दागिन्यां शिवाय काहीही दिसत नव्हते. मुलगी रात्रभर मधुर गाणी म्हणत राहिली आणि ही गाणी इतकी मोहक होती की साप त्या गाण्यांचा आनंद घेऊ लागले आणि दारातच थांबले. हे सर्व चालू असतांना रात्र उलटून गेली. अशा प्रकारे मुलीच्या विचित्र कल्पनेमुळे तिच्या पतीचे म्हणजे हैम राजाच्या मुलाचे प्राण वाचले आणि नागाच्या रूपात आलेल्या भगवान यमाला आपले कार्य सोडावे लागले. हे सर्व अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी केले गेले. या घटनेमुळे धनत्रयोदशीच्या दिवसाला महत्व निर्माण झाले आणि हा दिवस घरामध्ये समृद्धीला आमंत्रित करण्याचा आणि पतीचे दीर्घायुष्य मिळविण्याचा खात्रीचा मार्ग बनला.

दिवाळीचा दुसरा दिवस हा नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने दुष्ट नरकासुराचा वध केला असे पुराणात सांगितले आहे. नरकासुर किंवा भिमासुर नावाचा असुर प्राग्ज्योतीषपूर येथे राज्य करीत होता. त्याने इंद्राचे छत्र, अदितीची कुंडले आणि अमर पर्वतावरील मणीपर्व या नावांचे स्थान हरण केले. तो अजिंक्य होण्यासाठी आपल्या राजधानीच्या बाजूला पर्वतांचे आणि शस्त्रांचे कोट रचून मानव आणि देवतांस त्रास देऊ लागला. हा असुर दैत्य स्त्रियांना खूप त्रास देवू लागला आणि त्याने अनेक राजकन्यांना पकडून तुरुंगात ठेवले. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णास समजल्यावर त्याने सत्यभामेला बरोबर घेऊन नरकासुराच्या दुर्गावर हल्ला केला. त्यास ठार मारून सर्व राजकन्यांची सुटका केली आणि इंद्राचे लुटलेले धन त्यास परत केले. मग भगवान श्रीकृष्ण आपल्या कपाळावर त्याच्या रक्ताचा टीळा लावून घरी आले. घरी येताच नंदाने त्यास प्रथम मंगल स्नान घातले आणि स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. हे सर्व घडत असताना अश्विन महिन्यातील चतुर्दशीची पहाट झाली होती. अशा प्रकारे दीपोत्सवाचा दुसरा दिवस हा वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजयी उत्सव म्हणून साजरा केला जातो. यादिवशी दिवसभरात अनेक विधी पाळले जातात. त्यापैकी एक मुख्य म्हणजे सूर्योदयापूर्वी तेल लावून स्नान करणे हे आहे. या स्नानाला महाराष्ट्रात अभ्यंग स्नान म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र (विशेषतः कोकण भाग) आणि गोव्यात, भक्त नरकासुराचा कागदी पुतळा बनवतात ज्यात गवत व फटाके भरले जातात आणि पहाटे हे पुतळे जाळले जातात. यानंतर लोक घरी परततात आणि तेलाने आंघोळ करतात आणि नरकासुराचा वध करण्याच्या चिन्हात कारीट (एक कडू बेरी) पायाखाली ठेवून चिरडतात. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पोहे आणि बनविलेले गोड पदार्थ कुटुंबातील सदस्यांसह खाल्ले जातात. पश्चिम बंगालमध्ये हा दिवस भूत चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो तर गुजरात आणि राजस्थानमध्ये हनुमान पूजा केली जाते.

दीपोत्सवाचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. हा एक धार्मिक विधी असून त्यादिवशी अमावस्या असते. या दिवासाचे महत्व सांगताना असे सांगितले जाते की भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे. या दिवशी ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या घरी येते. म्हणून भक्त आपली घरे स्वच्छ आणि शुद्ध करून दिव्यांची सजावट करतात. मग देवी लक्ष्मीला तयार केलेली मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थ अर्पण करतात. लक्ष्मीपूजनाच्या संदर्भात विष्णु पुराणात एक कथा आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, दानव राजा बळी हा अतिशय तेजस्वी राजा होता आणि त्याने संपूर्ण विश्वावर राज्य केले. आपल्या संपत्तीने व सामर्थ्याने त्याने देवदेवतांना कैद केले. विष्णूची पत्नी लक्ष्मी देखील त्यापैकी एक कैदी असते. म्हणून विष्णूने वामन नावाच्या एका लहान व्यक्तीचे रूप धारण केले आणि बळीच्या दरबारात भेट घेतली. त्याला अशी जमीन देण्याची विनवणी केली की जेणेकरून तो तीन पावलांनी पुढे जाऊ शकेल. राजा बळीने ते मान्य केले. अशा प्रकारे, वामनाने पहिल्या पायरीने संपूर्ण पृथ्वी व्यापली आणि दुसर्‍या पायरीने त्याने पृथ्वी आणि स्वर्गातील मध्यवर्ती जग व्यापले. तिसरे पाउल ठेवाण्यासाठी जागा नसल्याने राजाने आपले मस्तक खाली केले आणि वामनला त्यावर पाय ठेवण्यास सांगितले. वामनने ही संधी पाहिली आणि आपल्या पायाच्या दाबाने राजा बळीला खाली पाताळात राज्य करण्यासाठी पाठवले आणि सर्व देवदेवतांना सोडवीले. देवी लक्ष्मीची राक्षसांच्या हातातून सुटका झाल्याचे कळताच सर्वांना आनंद झाला. हे सर्व आश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी घडले. तेव्हापासून या दिवशी लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करण्याची प्रथा सुरु झाली. या दिवशी व्यापारी आपली हिशोबाची पुस्तके काढतात आणि लक्ष्मी आणि सरस्वतीची पूजा करतात.

दीपोत्सवाचे पहिले तीन दिवस हे अश्विन महिन्यातील कृष्णपक्षाच्या शेवटच्या तीन दिवसात येतात. नंतरचे दोन दिवस हे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या दोन दिवसात येतात. त्यातील पहिला दिवस म्हणाजे दिवाळीचा चौथा दिवस असतो बलिप्रतिपदा. भगवान विष्णूने दैत्य राजा बळीला वामन रूप घेऊन पाताळात पाठवून दिले असे आपण वरील परिच्छेदात वाचले आहे. पण त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन वामन रुपी असलेले भगवान विष्णू खुश झाले आणि त्याला वरदान देताना त्यांनी सांगितले की, जरी मी तुला पादाक्रांत केले असले, तरी तुझी आठवण कायम राहण्यासाठी कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी तुझ्या नावाचा सण लोक आनंदाने साजरा करतील. काही पुराण कथेत असे उल्लेख आढळतात की विष्णूने जेव्हा बळीराजाला पाताळात पाठवून दिले तेव्हा त्याच्या अंतर्गत नकारात्मक उर्जा निर्माण होऊ लागली. म्हणून भगवान विष्णूने बळीराजाला वर देऊन त्याची तहान आणि भूक भागवण्यासाठी काही मिठाई किंवा गोड खाद्यपदार्थ अर्पण करून त्याची पूजा करण्यास सांगितले. त्यामुळे बळीराजाची नकारात्मक उर्जा नियंत्रणात राहते आणि वर्षभर कुणालाही त्याचा त्रास होत नाही. म्हणून या सणाला हिंदू धर्मात फार मोठे स्थान आहे कारण या दिवशी विश्वातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत होते. महाराष्ट्राच्या काही भागात खासकरून शेतकरी समाज शेणाच्या बाहुल्या करून जमिनीवर ठेवतात.त्यास पंचपांडव आणि कुंती असे नाव देत त्या बाहुल्यांची पूजा करतात. नैवैद्य म्हणून तांदुळापासून बनिवलेला पदार्थ देतात. नंतर त्या बाहुल्या घरावर सुकविण्यासाठी ठेवतात. पुढे कार्तिक पौर्णिमेला त्या पेटवून त्यावर तांदुळाची खीर शिजवतात.

दीपोत्सवाचा शेवटचा आणि पाचवा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज.या दिवशी मृत्यूची देवता यम याची पूजा करून नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारताच्या काही भागात विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये हा दिवस भाऊबीज म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात. हे रक्षाबंधनासारखेच आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीच्या घरी म्हणजे यमिच्या घरी जातात. त्यामुळे खुश होऊन यमी त्यांना ओवाळते आणि त्यांच्या कपाळावर तिलक लावते. मग यम खुश होऊन आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला वस्त्रालंकार देतो आणि तिच्या घरी भोजन करून तृप्त होतो. या प्रथेत असे सांगितले जाते की बहिणीकडून आरती आणि कपाळावर तिलक लावल्याने मृत्यूची चिंता राहत नाही. या दिवशीची अजून एक कथा पुराणात येते. ती म्हणजे श्रीकृष्णांनी जेव्हा नरकासुराचा वध केल्यानंतर तो दोन दिवसांनी आपली बहिण सुभद्रेकडे गेला. तेव्हा सुभद्रेने त्याला ओवाळले आणि त्यांच्या कपाळावर तिलक लावून त्यांचे स्वागत केले. त्यावेळी श्रीकृष्णांनी सुभद्रेला फुले, फळे, मिठाई आणि काही भेटवस्तू दिल्या. असे केल्याने बहिणभावात आपुलकीची भावना निर्माण होऊन प्रेम कायम राहते आणि दोघांच्याही मनाला अवर्णनिय आनंद होतो. म्हणून यमद्वितिया किंवा भाऊबीज हा बंधुप्रेमाचा स्मरणोत्सव असा दिवस आहे.

वर म्हटल्या प्रमाणे दीपोत्सव किंवा दिवाळी हा सण कधी प्रचारात आला हे सांगणे शक्य नसले तरी हा सण पौराणिक कालपासूनच महत्वाचा मांडला गेला आहे हे एक महत्वाचे सत्य आहे.. त्याशिवाय पुराण कथेमधील कथांशी या सणाचा संबंध जोडला गेला नसता. पौराणिक काळात भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे महत्त्व वाढल्यानंतर, अनेक उपासकांनी या देवतांच्या आणि त्यांच्या अवताराच्या अनेक कथा रचून सर्व सणांना त्यांच्या आवडत्या देवतांशी जोडणे सुरू केले. दिवाळी हा असा सण आहे जो मुख्यतः भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान कृष्णाशी संबंधित जोडला गेला आहे. पौराणिक कालखंडावर नजर टाकली तर लक्षात येईल की त्या काळी प्रचलित असलेल्या अनेक घरगुती विधींचे अनेक सणांमध्ये रूपांतर झाले असून दिवाळी हा त्यापैकीच एक सण आहे. यासाठी उपनिषदातील वेद आणि सूत्रांच्या सामाजिक परिस्थितीवर उपलब्ध असलेली माहिती खूप महत्वाची ठरू शकेल.

दीपोत्सव हा सण दीपावली, दिवाळी अशा नावाने सुद्धा ओळखला जातो. याचा व्यवस्थित अर्थ सांगायचे झाल्यास म्हणता येईल हा दिव्यांचा उत्सव आहे, दीप हे अग्नीचे आणि तेजाचे रूप आहे त्याचप्रमाणे ज्ञानाचे प्रतिकसुद्धा आहे. अशा या सुंदर दिव्यांची रांग किंवा रचना म्हणजेच दीपोत्सव होय. म्हणूनच या सणाला छोट्या छोट्या पणत्यामध्ये तेलवात घालून पेटवल्या जातात आणि एका मागून एक मांडल्या जातात. त्यामुळे वातावरण प्रसन्न होत जाते. म्हणून परमेश्वराकडे या दिवाळीच्या किंवा दिपोत्सवाच्यानिमिताने एकच मागणे आहे की या विश्वातील अंधार दूर होऊन सर्वत्र ज्ञानचा उदय होऊ दे .

दीपोत्सव सणाची माहिती माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

संदर्भ:
१.आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास
२.लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स मधील काही लेख
३. पुराण कथेतील काही संदर्भ.


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...