Skip to main content

Book Analysis : पुस्तकाचे विश्लेषण

 




वाचक प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने

पुस्तकाचे विश्लेषण
पुस्तकाचे नाव क्रमांक १:Indian Ideas of Freedom लेखक Dennis Dalton
पुस्तकाचे नाव क्रमांक २:You Must Know Your Constitution लेखक Fali Nariman
शब्दांकन:योगेश गोगवेकर
पत्ता:माहीम,मुंबई

दरवर्षी येणारा वाचक प्रेरणा दिवस अनेक शाळा, महाविद्यालये , वाचनालये आणि अन्य काही संस्थेमधून साजरा केला जातो. त्यावेळेस वाचनाचे महत्व काय असे सांगून या कार्यक्रमाची सांगता केली जाते. अशावेळेस कुठली पुस्तके वाचली पाहिजे किंवा वाचलेल्या पुस्तकातून वाचकाचे काय आकलन झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न या संस्था करीत असल्या पाहिजे असे मला वाटते. इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे वाचन चळवळ फक्त वर्षातून एकदा न करता ती महिन्यातील एका दिवशी कोणत्याही आठवड्यात केली जावी म्हणजे या चळवळीचे महत्व वाढण्यास मदत होईल. असो, या वाचन प्रेरणेच्या निमित्ताने मी वाचलेल्या दोन पुस्तकांबद्दल मला झालेले आकलन लिहित आहे.  

हल्ली दोन इंग्रजी पुस्तके माझ्या वाचनात आली आणि या दोन्ही पुस्तकांनी परत एकदा भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि त्यातून निर्माण झालेले संविधान याबद्दल नव्याने माहिती समजून घेण्यास मदत केली. या दोन पुस्तकांची नावे आहेत ,’Indian Ideas Of Freedom’ written by Dennis Dalton आणि दुसरे पुस्तक आहे ,’ You Must Know Your Constitution’ written by Fali Nariman. ही दोन्ही पुस्तके म्हणजे भारत नावाच्या देशाची वेगळी कल्पना समजून घेण्यासाठी आहे असे मला वाटते. इंडिअन आयडियाज ऑफ फ्रीडम हे पुस्तक आपल्याला भारतातील सात विचारवंताच्या नजरेतून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची पर्यायी संकल्पना उघड करताना स्वातंत्र्य हे केवळ स्वातंत्र्य नसून आत्म-परिवर्तन आहे असे नमूद करते. दुसरे पुस्तक तुम्हाला तुमचे संविधान समजलेच पाहिजे (You must know your constitution) असा दावा करते. या पुस्तकात आपल्याला स्वतंत्र भारताचे संविधान काय आहे याची व्यवस्थित माहिती सुस्पष्ट आणि पद्धतशीर शैलीत सांगताना भारताच्या शासनाच्या दस्तऐवजाचा इतिहास आणि उत्पत्ती तर शोधते आणि त्यातील तरतुदी सुद्धा स्पष्ट करते. म्हणून ही पुस्तके वाचताना आपल्याला सर्व बाजूने आजच्या घडामोडीचा विचार व्यवस्थितपणे करता येतो.  

पहिल्यांदा आपण बघूया डेनिस डाल्टन लिखित इंडिअन आयडीयाज ऑफ फ्रीडम (Indian Ideas of Freedom) या पुस्तका बद्दल. आपणास माहित आहे की भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा ब्रिटीश वसाहती विरोधाचा होता आणि या राजवटीला आव्हान देण्यासाठी वसाहतवादी तंत्राचा अवलंब करावा लागला. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय लोकांमध्ये स्वातंत्र्याची जी उदारमतवादी संकल्पना तयार झाली ती पूर्णपणे भारतीय बौद्धिक कल्पनेतुन तयार झाली होती. अशा वेळेस हे पुस्तक आपल्याला स्वातंत्र्याचा एक चिंतनशील आणि तात्विक अभ्यास राष्ट्रीय कल्पनेच्या मुळाशी जाऊन विचार करून करायला लावते. हे पुस्तक स्वातंत्र्याच्या लढ्याचे बारकाईने केलेले परीक्षण आहे आणि हे करीत असताना लेखकाने अतिशय मजबूत पुरावे दिले आहेत. असा प्रयत्न करताना लेखकाने सात भारतीय विचारवंतांचा दृष्टीकोन भारतीय स्वातंत्र्याचा विचार करताना घेतला आहे. ते सात विचारवंत आहेत स्वामी विवेकानंद, अरबिंदो घोष, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, एम एन रॉय आणि जयप्रकाश नारायण. जेव्हा लेखक या सात विचारवंताच्या दृष्टीकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट जाणवते ती म्हणजे हे पुस्तक आधुनिक उदारमतवादी व्यक्तिवादी प्रवचनाला अध्यात्मिक शोधांसह स्वातंत्र्याचा ताळमेळ घालते. इथे लेखकाने एक नवीन पर्यायी संकल्पना निर्माण केली आहे. लेखकाच्या मते स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय किंवा आर्थिक स्वातंत्र्य नसून ते स्व-परिवर्तन आहे. ते म्हणतात की आधुनिक भारत ही संकल्पना ही केवळ पाश्चात्य प्रवचनाची व्युत्पन्न नसून त्यामागे भारतीय आत्म-परिवर्तनाचे सभ्यतावादी सिद्धांत आहेत की ज्यात महात्मा गांधींचा अंतदृष्टीचा प्रतिध्वनी परिभाषित होतो. त्यामुळेच या पुस्तकाचा तल्लीन दर्जा समजून घेण्यास मदत होते.

इंडिअन आयडीयाज ऑफ फ्रीडम हे पुस्तक वाचताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे ज्या सात विचारवंतांचे विचार या पुस्तकात समविष्ट करीत लेखक चांगले जीवन म्हणजे काय हे सांगताना भारतीय भौतिक कल्पनांची पुनर्रचना करण्याच्या सामायिक चिंतेवर प्रकाश टाकला आहे. मग त्यात स्वामी विवेकानंदावर झालेला रामकृष्ण परमहंस यांचा दैवी प्रभाव असो, कट्टरपंथीयांकडून अध्यात्माकडे अरबिंदांची उत्क्रांती असो, टागोरांची राष्ट्रवादाची टीका असो, गांधींची स्वराज्य आणि सत्याग्रहाची निर्मिती असो, डॉ आंबेडकरांचा समानतेचा आणि बंधुत्वाचा ध्यास असो, एम एन रॉय आणि जयप्रकाश यांचा मार्क्सवादापासून दूर गेलेला बुद्धिवाद असो. या सर्वाना डाल्टन केवळ राजकीय सिद्धांत न मानता स्वराज्यातील वैयक्तिक विचार मानतात. डाल्टनच्या मते या सर्वांचा स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रवास अहिंसेच्या मार्गाने होता. आधुनिकतेकडे जाताना या सात विचारवंताना सर्व बाबतीत बदल जरूर हवा होता पण या बदलाचे रुपांतर कुठेही हिंसक पद्धतीने करणे बरोबर नसून ते दुसऱ्याचे मन वळवून केले पाहिजे असा त्यांचा दावा होता. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि समृद्ध अभिलेखीय साहित्य एकत्र करून भारताच्या अध्यात्मिक इतिहासासाठी अद्वितीय असलेल्या स्वातंत्र्याच्या सिद्धांताची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. मला असे वाटते असा प्रयत्न अजून तरी कोणत्याही जगातील लेखकाने केलेला नाही. डाल्टन हे पुस्तक जगासाठी भारताचे सर्वात मोठे योगदान आहे आणि लोकशाही मार्गावरून हुकुमशाहीकडे जाणाऱ्या प्रत्येक देशाला हे पुस्तक नैत्तिक संघर्षासाठी संभाव्य मार्ग दाखवू शकेल. या पुस्तकाला सुप्रसिद्ध इतिहासकार आणि महात्मा गांधींचे चरित्रकार लेखक रामचंद्र गुहा यांची प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे कारण हे पुस्तक एक अनुभवात्मक सत्य आहे.

आता आपण दुसऱ्या पुस्तकाकडे वळूया. ते सुद्धा इंग्रजी पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे, “You Must know Your Constitution” या पुस्तकाचे लेखक आहे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ फली नरीमन. न्यायक्षेत्रातील त्यांचे विशिष्ट योगदान आहे. त्यांनी देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदांवर कायद्याच्या अंतर्गत काम केले आहे. या पुस्तकाच्या अगोदर त्यांचे ‘Before Memory Fades’ हे आत्मचरित्र इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी लिहिलेले तुमचे संविधान तुम्हाला माहित पाहिजे. हे पुस्तक खूप आश्चर्यांनी भरलेले आहे. सुंदर इंग्रजी भाषेच्या वापरामुळे हे पुस्तक वाचताना खूप आनंद सुद्धा देते.  हे पुस्तक प्राचीन काळामध्ये असलेल्या मनुस्मृती पासून सध्या चर्चेत असलेल्या सर्व कायद्यांच्या सुधारणांच्या समकालीन समस्या पर्यंत व प्रत्येक कायद्याच्या विकासाचा मागोवा घेते. सध्या कुठलीही चर्चा न करता किंवा एखाद्या सुधारणेचा समाजावर कोणता खोल परिणाम होईल याचा विचार न करता जे काही कायद्ये बनविले जात आहे, त्यावर सुद्धा हे पुस्तक प्रकाश टाकते. खूप संशोधन करून लिहिलेले हे पुस्तक संक्षिप्तता न गमावता जटिल प्रश्नांची अंतदृष्टी सांगते. सरळ आणि सोप्या भाषेत अशा काही कथा लेखकाने लिहिल्या आहेत की त्यातील आशय समजून घेण्यास मदत होते. ब्रिटीश साम्राजाचा प्रचंड आवाका असूनसुद्धा किंवा प्रचंड जागतिक प्रभाव असूनसुद्धा भारताने हे संविधान भारतीय दृष्टीकोन ठेवून बनविले आहे असे हे पुस्तक मान्य करते. भारतीय संविधानावर या पुस्तकात केलेले भाष्य हे अतिशय विचाराने किंवा पांडित्य पद्धतीने केले असून त्याने अनुभवाचे समृद्ध रूप पहावयास मिळते. हे पुस्तक लिखित संविधानाची जशी गरज सांगते तसेच भारताने हे संविधान बनवताना रचनाकारांनी गांधीजींचे बरेच विचार संविधानात घेऊनही गांधीवादी संविधान असा उल्लेख न करता जाणीवपूर्वक संसदीय लोकशाही, संघराज्य प्रजासत्ताक असे शब्द का स्वीकारले? असे प्रश्न हे पुस्तक विचारते. त्याचप्रमाणे समान नागरी कायद्याचे कलम संविधानात जरी असले आणि फक्त चार गोष्टींमध्ये समान नागरी कायदा सुरुवातीपासून का घातला गेला नाही? असे प्रश्न विचारून हे पुस्तक म्हणते की आता ज्या चार गोष्टींमध्ये समान नागरी कायद्या नाही आहे, तो लागू करण्याची आज गरज आहे का? त्याचप्रमाणे नागरिक कायद्याबद्दल हे पुस्तक काही प्रश्न विचारून म्हणते की यातून आपण नक्की काय साधणार आहोत याचा तपशील विचारते.

२६ जानेवारी १९५० रोजी भारताने हे सर्वात लांब संविधान औपचारिकपणे स्वीकारून एका उपखंडाला स्वतंत्र प्रजासत्ताक भारतामध्ये रूपांतर केले. भूमीचा सर्वोच्च कायदा, भारतीय लोकशाही आणि राजनैतिकतेची कार्यपद्धती आणि त्यातील तरतुदींचा उद्देश भारतातील लोकांसाठी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व सुरक्षित करण्यासाठी संविधान बनविले गेले. थोडक्यात म्हणजे हे संविधान भारतीय राष्ट्रवादाचा मुलभूत पाया आहे असे सांगताना हे पुस्तक आपल्याला संविधानाचा इतिहास सांगू लागते. त्याप्रमाणे हे पुस्तक संविधानाच्या काही महत्वाच्या गोष्टींकडे आपले लक्ष नेते. त्यातील काही उदाहरण म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या बावीस भागांचे माहितीपुर्ण लिखाण, त्यामध्ये राज्यघटनेच्या सर्व कलमांची व्यवस्थित माहिती आहे. काही गंभीर प्रकाराने आणि प्रमुख घटनात्मक घडामोडींचे संदर्भ हे पुस्तक प्रदान करते. त्याप्रमाणे सरकारी संस्थाची रचना, अधिकार आणि निर्देश तत्वांचे अंतदृष्टीने खूप छान पणे वर्णन या पुस्तकात आहे. हे सर्व पुस्तक वाचून झाल्यावर असे वाटते की फली नरीमनने हे पुस्तक तरुण वर्गांसाठी लिहिले असून या तरुणांना भारतीय संविधान काय आहे आणि त्याचे महत्व काय आहे यावर विचार करण्याची संधी मिळेल.

म्हणून मला असे वाटते की ही दोन्ही पुस्तके प्रत्येक भारतीयांनी नक्कीच वाचली पाहिजे आणि त्याचा उपयोग स्वातंत्र्याची व्याख्या समजून घेऊन, संविधानाचे महत्व समजून घेऊन, भारताची संसदीय लोकशाही टिकून ठेवण्यात मदत होईल.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...