Skip to main content

Prem प्रेम

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १७३
विषय : प्रेम (लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :

प्रेम कुणावरही करावं.
प्रेम -
योगावर करावं 
भोगावर करावं
आणि त्याहून अधिक
त्यागावर करावं.
ज्याला तारायचं
त्याच्यावर तर करावंच
पण ज्याला मारायचं
त्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं 
कारण -
प्रेम आहे माणसांच्या
संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि भविष्यकाळातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव!
वरील ओळी आहेत कवी कुसुमाग्रज यांच्या प्रेमयोग या कवितेतील. किती सहजपणे त्यांनी कृष्णाचे विविधरंग सांगताना प्रेमाची कल्पना मांडली आहे. कृष्ण चरित्र वाचताना प्रेम म्हणजे काय असते ते आपल्याला सहजपणे समजून येते. कारण भगवान श्रीकृष्ण कोणतेही काम करताना ते प्रेमाने करतात. म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यांना ते काम करताना आनंद मिळतो. याचाच अर्थ प्रेम ही एक भावना आहे. प्रेम कुणावरही म्हणजे वस्तू, आपण राहत असलेला परिसर, एखादे शहर किंवा गाव, व्यक्ती, प्राणी  यांवर करू शकतो. एखादी व्यक्ती परमेश्वराशीसुद्धा प्रेम करू शकते. म्हणून प्रेमाला एका विशिष्ट मर्यादेत बांधता येणार नाही. प्रेम एक निर्मळ भावना असून आकाशात उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे स्वतंत्र असते.  ही भावना फक्त स्त्री पुरुष यांच्या प्रेम प्रसंगापूरती मर्यादित असत नाही. प्रेम असल्याशिवाय या जगातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मदत करू शकणार नाही  प्रेम पती पत्नी मध्ये असते तसेच बहीण भाऊ, मित्रांमध्ये सुद्धा असते. प्रियकर आणि प्रेयसी मध्ये जसे असते तसेच ते गुरु आणि शिष्या मध्ये सुद्धा असते. कोणाचाही तिरस्कार किंवा द्वेष करून स्वतःचे जीवन समृद्ध करू शकत नाही. ते फक्त प्रेमानेच होऊ शकते. प्रेमाशिवाय माणसाला जगणे शक्यच होणार नाही. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे प्रेम नेहमी निःस्वार्थी असते.

प्रत्येक माणूस निःस्वार्थीपणाने एखाद्या व्यक्तीवर प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती त्या माणसावर तेवढ्याच निःस्वार्थीपणाने प्रेम करीत असेल का? हा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकमेकांशी सन्मानाने वागतात तेव्हा त्यांच्या प्रेमातला निःस्वार्थीपणा जाणवत असतो. अशा व्यक्ती स्वतःपेक्षा ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवतात तेव्हा त्यांच्यातील एकमेकांमधील नाते आणखी मजबूत होते. तेव्हा ते एकमेकांची काळजी घेत निःस्वार्थीपणाने एकमेकांना सहकार्य करून अवघड कामे सोपी करून टाकतात. आपापसातील नाते खराब होऊ नये म्हणून अशा व्यक्ती कठीण परिस्थितीत स्वतःची नसताना सुद्धा माघार घेतात आणि नाते टिकवून ठेवतात. वर म्हटल्याप्रमाणे प्रेम ही एक स्वतंत्र्य भावना असते. म्हणून एकमेकांवर प्रेम करणारी व्यक्ती नेहमीच एकमेकांना स्वातंत्र्य देत असते. कुठलेही निर्बंध लावले तर ते निःस्वार्थी प्रेम होणार नाही. इथे मला परत कुसुमाग्रजांची अजून एक कविता आठवते ती म्हणजे " प्रेम म्हणजे काय असतं... त्यात ते म्हणतात
प्रेम म्हणजे काय असतं,
जे हळुवार जपायच असतं,
हृदयात साठवून ठेवायचं असतं
कितीही दुःख झाल तरी हसत जगायच असतं,
प्रेम म्हणजे काय असतं,
ते फक्त शेवटपर्यंत...
तिच्यात आणि आपल्यात असतं
त्याच्यात आणि आपल्यात असत...

कविता, गाणी, कादंबरी, कथा आणि सिनेमा या माध्यमातून नेहमी रोमँटिक प्रेमाचा उल्लेख वर्षानुवर्षे झालेला दिसून येतो. काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पुरावे आपल्याला असे सांगतात की अशा प्रकारचे प्रेम प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. या प्रेमाचा अनुभव लोक कसा घेत होते आणि त्यांचे संदर्भ कसे बदलत गेले यावर अनेक मानसशास्त्रीय संशोधन झाले आहे. त्यात एखाद्यावर प्रेम करणे आणि एखाद्याच्या प्रेमात असणे यातील फरक तपासताना असे दिसून आले की एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा त्या  व्यक्तीबद्दल त्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीला  सकारात्मक विचार आणि भावना असते. अशा व्यक्तीचा सहवास त्यांना हवा असतो तसाच त्या व्यक्तीचा प्रेमळपणा त्यांना हवा असतो. त्यांच्यात उत्कट प्रेम असते. त्यात उत्कटतेच्या भावना आणि तीव्र उत्कंठा यांचा समावेश असतो. रोमँटिक प्रेमात होणारे बदल मानसशास्त्रीय संशोधनात व्यवस्थितपणे दिले आहे. हे संशोधन सांगते की उत्कट प्रेमाची सुरुवात जरी जास्त होत असली तरी त्या प्रेमाची नात्यात परिवर्तन झाल्यावर ती कमी कमी होत जाते. याचे कारण म्हणजे नातेसंबधात भागीदार एकमेकांना अधिक समजून घेतात आणि आपल्या नात्यामधील आत्मविश्वास मजबूत करतात. जीवनातील घटना आणि स्थित्यंतरे उत्कटतेच्या प्रेमाला आव्हान देत असतात. स्पर्धात्मक जबाबदाऱ्या उत्कटतेने मर्यादित करतात. तरी सुद्धा अशी रोमँटिक प्रेम करणारी माणसे दीर्घकाळ एकत्र राहत असतात याचे कारण म्हणजे प्रेम ही भावना एकमेकांना बांधून ठेवते. म्हणून हे मानसशास्त्रीय संशोधन म्हणते की रोमँटिक प्रेमात प्रत्येक व्यक्ती समान आवड असलेल्या व्यक्तींशी नातेसंबंध ठेवण्यास प्राधान्य देतात. इथे आपुलकी उघडपणे व्यक्त केली जाते. एकमेकांवर प्रचंड विश्वास ठेवतात आणि ते कुणावरही अवलंबून असत नाही.  कितीही संशोधनामार्फत प्रेमाची शैली जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी एक गोष्ट सर्व माणसांसाठी समान राहते, " प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे".

खरंच प्रेम ही एक अशी भावना आहे जी प्रत्येक माणसांना एकमेकांच्या जवळ आणते आणि ती प्रत्येकाला एकमेकांची काळजी घेण्यासाठी तयार करते. त्यामुळे प्रत्येकामध्ये खोल भावना निर्माण होतात. एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो. एकमेकांशी जवळीक आल्यामुळे नात्यात समजूतदारपणा आणि विश्वास निर्माण होतो. अहंकाराला प्रेमात जागा नसते. द्वेष, तिरस्कार या गोष्टी आपोआपच दूर होतात. प्रत्येकाने असे प्रेम शोधले पाहिजे की जे समाधान देईल, आनंद देईल आणि तुमचे जीवन सर्वोत्तम बनवेल. म्हणून महात्मा गांधी म्हणतात, "Love is the strongest the world possesses and yet it is a humblest imaginable. Love never claims, it ever gives. Love ever suffers, never resents, never revenges itself ". तर मार्टिन लुथर किंग म्हणतात, "Darkness cannot drive out darkness; Only light can do that. Hate cannot drive out hate ; only love  can do that ".  किती खरे आहे या दोन महापुरुषांनी व्यक्त केलेली प्रेमाची भावना. मग ते प्रेम भावनिक असो किंवा मानसिक, अध्यात्मिक असो वा शारीरिक. त्यासाठी हवा विश्वास, आपुलकी आणि समजून घेण्याची क्षमता. म्हणूनच कवी कुसुमाग्रज आपल्या प्रेम म्हणजे या कवितेत म्हणतात,
प्रेम म्हणजे काय असतं,
ते फुलपाखराला फुलांशी असतं,
काजव्याला घनदाट अंधाराशी असतं,
गुणगुणणाऱ्या पतंगाला मीणमिणत्या दिव्याशी असतं.
प्रेम म्हणजे काय असतं.
जस सुखाला दुःखाशी असतं
हसण्याला रडण्याशी असतं,
रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं.

खरच प्रेमामध्ये केवढी अजब ताकद असते. द्वेष करून कुणालाही सुख मिळत नाही. कारण प्रेमाची खरी व्याख्या आहे निःस्वार्थी मनाने आपण प्रेम करणाऱ्या माणसाला आपले सर्वस्व अर्पण करणे. प्रेम जीवन देते, जीवन घेत नाही. परमेश्वराने दिलेली ही एक पवित्र वस्तू आहे त्यामुळे प्रेमाला इच्छा आणि वासनेत अडकून ठेवू नये. प्रेम लोकांना एकत्र करते. आपली अस्वस्थता दूर करते. प्रेम आपल्याला आपले सुंदर सामर्थ चांगल्या गोष्टी निर्माण करण्यास मदत करते. मग ते क्षेत्र कुठलेही असो. प्रत्येक चांगल्या गुणांची परख प्रेम करून देते आणि जगातून सर्व कलह दूर करण्यास मदत करते. या लेखाचा शेवट मी तेरे घर के  सामने या चित्रपटातील हसरत जयपुरी यांच्या गाण्यातील कडव्याने करीत आहे. ते म्हणतात या जगात शत्रुवर सुद्धा प्रेम करा म्हणजे तुम्हाला जगण्याची मजा येईल. प्रेम समजून घ्या कारण देवाने निर्माण केलेले आकाश, जमीन हे सर्व प्रेमासाठी केले आहे. त्या ओळी आहेत
आज तक जो भी हुआ
झुठे जगडो ने किया
प्यार होता तो कुछ न होता
न उजडते आशिया
सुन ले तु दिल की सदा
प्यार से प्यार सजा.

प्यार दुश्मन मे बडा
तब है जीने का मजा
ये जमीन भी तु बना
दे मिलन का आसमान
सुन ले तु दिल की सदा
प्यार से प्यार सजा 

धन्यवाद
योगेश गोगवेकर 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...