विषय : पुस्तके आणि माणसे शब्दांकन: योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई आज सर्व समाजाचे एवढे ध्रुवीकरण झाले आहे की माणसा माणसांमध्ये वैमनस्य वाढताना दिसत आहे. त्यामुळे माणसांमधील माणुसकी संपत आहे का ? असे सतत वाटत आहे. हे किती काळ चालू राहील याचा अंदाज येत नसल्यामुळे मन खूप अस्वस्थ होत आहे. अशा वेळेस दोनच गोष्टी माणसाच्या मनाला या अस्वस्थेमधून बाहेर काढू शकतात असे मला वाटते. त्या दोन गोष्टी म्हणजे माणसाने निर्माण केलेला त्याचा बगीचा आणि स्वतःच्या मेहनतीने उभे केलेले स्वतःचे वाचनालय. या दोनच गोष्टी माणसाला त्याची माणुसकी जिवंत ठेवण्यास मदत करीत राहतात आणि त्यात पुस्तकाचा उपयोग जास्त होतो. कारण या अविवेकी वातावरणात पुस्तकेच माणसाचा हरवलेला विवेक त्याला परत देवू शकतात आणि त्याला वैचारिक दृष्ट्या सक्षम बनवत असतात, त्याला जगण्यासाठी आधार देतात आणि माणसाचे आयुष्य समृद्ध करतात. पुस्तकामधून माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळते. त्यात कादंबऱ्या, कथा, ललित, नाटकं, वैचारिक, भाषांतरीत व रुपांतरीत असे अनेक प्रकारचे साहित्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असते. भौतिकदृष्ट्या ते शब्दां...