रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २३७ विषय क्रमांक: ४ विषय : मी माणूस शोधतोय शब्दांकन: योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई मी माणूस शोधतोय म्हणजे नक्की काय शोधणार आहे हा विचार माझ्या मनात येत असतानाच मला लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे या आत्मचारित्रातील त्यांनी लिहिलेला एक प्रसंग आठवला. त्या एक सामाजिक कादंबरी लिहित होत्या. लिहित असताना त्या एका गोष्टीकडे येऊन थांबल्या. काही केल्या त्यांना पुढे जाता येईना. कारण त्यावेळी त्या शोध घेत होत्या माणसाचा. पण माणसाचा शोध घेणे म्हणजे नक्की काय आहे, हे त्यांना सुचत नव्हते. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके उलटी पालथी केली. तरी त्यांना माणसाचा शोध लागत नव्हता. इथेच त्यांना साहित्याचा खरा धर्म जाणवला तो म्हणजे माणूस शोधण्याचा. मग प्रश्न पडतो की माणूस शोधणे म्हणजे नक्की काय ? याचे उत्तर सांगताना त्या म्हणतात माणसाचा शोध म्हणजे माणसातल्या माणूसपणाचा शोध घेणे असा आहे. याचाच अर्थ त्याच्यातील अंत:प्रवृत्तींना भिडून त्याच्यातले सत्त्व शोधणे आणि हे सत्व म्हणजे माणसातील माणूसपण. तसे बघायला गेले तर माणूस हा प्राणीसृष्टीचा एक भाग आहे. ...